Tuesday, March 27, 2012

झाडांनो इथून पुढे


झाडांनो घ्या मजा करून
तुमची पिढी शेवटचीच कदाचित; स्वातंत्र्य उपभोगणारी.
इथून पुढे तुंम्हाला नाही मिळणार मुभा
बी पडेल तिथे उगवायला आणि
वेलींना म्हणू तसं अंगाखांद्यावर खेळवायला.

हळू हळू चढत जाईल तुमच्यावर कॉर्पोरेट लूक.
पक्षांना ठरवून दिली जातील
त्यांची स्थानं, त्यांची घरटी ‘चायना मेड’.

झाडांनो इथून पुढे नाही करावी लागणार तगमग
कातळ कापून ओलावा शोधायची. तो टिकवायची.
ठरल्यावेळी ठरला कोटा ठिपकत राहील तुमच्यापर्यंत.

दुबळे असाल तर मिळेल आधार
रोगी असाल तर औषधही
खंगलात तर वेळीच बंदोबस्त होईल तुमचा
स्वेच्छामरणाचा विचार मनात येण्यापूर्वीच.
माधामाशाही उडविल्या जातील हव्यातेव्हा-हव्यातशा.
परागकणांच्या उलाढालींचे डिजीटल मोजमाप होईल आपोआप.

इथून पुढे नाही रंगणार चर्चा एखाद्या अंगणात
तुम्ही कसे वागता याची.
आणि नाही चढणार एखादं मुजोर पोर शेंड्यापर्यंत सणासुदीला.
आमावस्या-पौर्णिमेला तुमच्या
सावल्यांची नि हालचालींची भीती नाही वाटणार दुबळ्या मनात.
की सवाष्णीही नाही धरायच्या फेर साताजन्मीचा.

पण आज जो घेतो मोफत श्वास आंम्ही आणि
होतो तरतरीत तुझ्या सावलीत कुठेही.
उद्या त्याच श्वासांसाठी आणि सावलीसाठी
काढून ठेवलेल्या कर्जांचे हप्ते चिकटून असतील आमच्या झोपेला.
झाडांनो आज घ्या मजा करून आणि
मलाही पडू द्या निपचित तुमच्या सावलीत.
उद्या मीही असू शकतो तुमच्या कार्पोरेट जगाचा यशस्वी उद्योजक.
  

Monday, March 19, 2012

किंवा


जातही असू आपण एकमेकांच्या 
जवळून भर रस्त्यातून नकळत
किंवा समोरा-समोर होताना ऐनवेळी वळत असू सावकाश
किंवा अगदी स मां त र असू रस्त्याच्या कडेने

किंवा
खुपच दूर असशील सातासमुद्रापलीकडे कम्फर्ट
किंवा  
 भलत्याच वेशीवर
किंवा
हयातही नसशील. ठाऊक नाही

किंवा 
 पुढे-मागे
अगदी भेटलोच आपण
योगायोगानं, प्रयोजनानं, ओझरते, कडकडून-घट्ट.
तरी काय? काहीच नाही

यां खोल आकाशाखालच्या छतावर
मी सोडतो आहे एक एक श्वास. बस.
आणि  पुन्हा घेतो आहे भरून.
कदाचित याच वाऱ्यात वाहून आला असेल तुझा निःश्वास माझ्यासाठीचा
किंवा माझाही एखादा निःश्वास बनत असेल तुझा श्वास. काहीही

किंवा
बघत असू या क्षणी एकच तारा आकाशातला
आणि अगदी याच क्षणी तूही करत असशील हाच विचार. हो ना?

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...