Wednesday, January 31, 2024

 स्वतःच्याच प्रेमात पडतं आकाश

जेव्हा ते पाहतं स्वतःलाच नदीच्या आरसपानी डोहात..

अन नदीलाही होते खुशी..

तरीही म्हणतेच ती लाडिकपणे,

“बाबा रे तूच पाडतोस न पाऊस?”

तेही कुजबुजत सांगतं तिला

“तू आहेस म्हणूनच मला मी पाहू शकतो. अन मी आहे म्हणूनच मी बरसू शकतो.

 

-कमलेश कुलकर्णी

Tuesday, September 05, 2023

आता नेमकं

 

आता नेमकं सांगता येत नाही की

या खुणा ज्या मी इतक्या आजिजीने लक्षात ठेवत चाललो आहे त्या

पुन्हा इथे येण्यासाठी की पुन्हा ‘इथे’ न येण्यासाठी..

 

आता नेमकं म्हणता येत नाही की

या फोफावणाऱ्या पसाऱ्यात

माझ्या एकांताची पांगोपांग होते आहे की तो एकवटतो आहे..

 

आता नेमकं साधता येत नाही

एकाच वेळी तिचं आणि माझंही भलं

अंतरंग

 अरे तू अजारा

एकांताचा निवारा

माझ्याच आधारा

आला बरा


तुझ्या रूपे मी

झालो गर्भारशी

कळा सावकाशी

सोसुयात


नाही कसा म्हणू

तुज पांडुरंग

मज अंतरंग

दावलेसी 

Tuesday, October 11, 2022

हसे

 या जगाचे ' असे ', त्या जगाचे 'तसे'

पण माझे मला आवरेना हसे


संचिताचा सुरू बघ जुना डाव हा

पाहिले मी तुला, लागलेना पिसे


आज प्रेमासही लागती साधने

कापले काल अंतर 'अंतरा'ने कसे


जिंकला आज मी सर्व एकांत हा

हारली बघ तुझी तू किती माणसे


तू मला, मी तुला द्यायची सावली

ना रेखायचे सावल्यांचे ठसे


श्वास नव्हतेच ते जन्म होता नवा

या नव्याला मरण बघ नवेही नसे 


कमलेश कुलकर्णी

Sunday, February 07, 2016

इतका आहे लळा

इतका आहे लळा तरीही झाले आहे नको नको
मी जगण्याला, जगणे मजला करते आहे नको नको

जो तो मजला सांगून जातो काळ चालला पुढे पुढे
इकडे साधी वेळ गाठण्या होऊन जाते नको नको 

पैशाने या आणली असती किती सुखे मी दाराशी
जुने जीर्ण हे दुखणे कण्हते त्यात विकतचे नको नको

कितीक डोंगर उलटून आलो सखे तुझ्या मी दाराशी
उम्ब्र्याशी तू येऊन म्हणतेस आत्ता काही नको नको

घेऊन बसलो रात्र उशाशी उगाच स्वप्नाला घरघर
स्पप्नच म्हणते झोपेला या जा बाई तू नको नको

भेटतात हे लोक जरासे, बोलतात, देती टाळ्या
मीच मला भेटाया करतो दहा दहादा नको नको

आता वाटे उगाच तेव्हा तडफड केली जगण्याची
बसलो असतो असाच आणि म्हंटले असते ‘नको नको’

एक वाट ही आहे अजुनी नेते मजला पुढे पुढे
पायांमधले काटे बोथट करती मजला नको नको

हृदयामध्ये विहीर आहे खोलखोलशी भीतीची

पणती विझते आणिक होते आत उतरणे नको नको 

मरून गेले झाड

मरून गेले झाड तरीही कळले नाही
कोणाचेही अश्रू तेथे ढळले नाही

गर्द सावली होती तेव्हा होती गर्दी
झडून गेल्यावरी कुणी चुकचुकले नाही

नुकते नुकते आले होते वयात ते तर
पाणी कोठे मुरते त्याला कळले नाही

वळवाचा हा पाउस घेऊन आला वारा
आज किती वर्षातून ते थरथरले नाही

नका नका हो तेच तेच ते खोड उगाळू

जुनेच आहे तेही अजुनी जळले नाही  

या चौकात

फेसबुकी पॉपकॉर्नने पोट भरेना
व्हॉट्सअॅपच्या खिडकीतून कुणी ढुंकवेना
‘काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं’च्या ओझ्याखाली काहीच करवेना
शेवटी, ‘आपल्याच खिशाला पैसा कमी लागला’ या जागतिक विचारानं
मी कुठल्याशा चौकाला लागलो
तर चौकात, Being Human चा टीशर्ट घातलेला मुलगा
Che Guevara चा टीशर्ट घातलेल्या मुलाशी वाद घालत होता
रागाच्या भरात Being Human चा गुलाबी टीशर्ट घातलेल्या मुलाने
Che Guevara चा ऑफव्हाईट टीशर्ट घातलेल्या मुलाच्या कानाखाली पेटवली
आणि गुद्दागुद्दी सुरु झाली
चौकातून चाललेले, चौकाच्या भवतीच्या दुकानातील एकेकटे लोक
त्या मारीमारीभवती समूह झाले
माझ्यासमोर त्या घोळक्यात
एक नितळ सावळ्या त्वचेची, पाणीदार डोळ्यांची, बॉपकट केलेली,
ब्लॅक जीन्स ब्लॅक टीशर्ट घातलेली मानेवर कोवळीशी लव असलेली
तरतरीत मुलगी ती मारामारी पहात उभी होती
एवढ्या सगळ्या गदारोळात, माझ्या एकटेपणात
मी तिला पहात असताना मी मला पाहिलं
मग मी माझ्यासकट चौक बदलला

तर या चौकात….! 

Friday, December 14, 2012

ब्रँडेड पँ‌‍‌ट‌‍‌‍‍‍‌चाही निघून जातो रंग पहिल्या धुण्यात तेव्हाब्रँडेड पँ‌‍‌ट‌‍‌‍‍‍‌चाही निघून जातो रंग पहिल्या धुण्यात तेव्हा
कर्तव्यदक्ष ग्राहकाची भूमिका संचारते माझ्या तना-मनात

आणि मी सरसावतो पँटसहीत मॉलमध्ये
तिथली रिसेप्शनिस्ट घेऊन जाते मला कम्प्लेंट डिपार्टमेंटकडे अदबीने
“इसमें आपकीही कुछ गलती होगी”
हे ऐकून निघून जाते हवा माझ्यातल्या उत्साही रागाची

मी प्रयत्न करीत राहतो मॅनेजरपर्यंत पोहचण्याचा
आणि मुर्ख ठरत जातो ‘सिस्टेमॅटिक’ नजरेत
इथला एचआर समजावतो एका कोपऱ्यात
”आपने पहले ड्रायक्लीन करना चाहिये था
आज कल सभी लोग करत है.
एक दो प्रॉडक्ट फॉल्टी रहतेही है”

मी मान्य करून टाकतो माझा नैतिक पराभव
आणि इतक्या घुसमटीतही
सक्तीचं हेल्मेट चढवून परततो घरी 

ब्रँडेड पँटचा गेलेला रंग माझ्या ब्रँडेड बनियनवर
येऊन बसलेला असतो पर्मनंट
माझ्या ब्रँडेड बनियनची जमा झालेली बेंबीतली सुतं काढीत
मी पूर्ण करतो माझ्या आयुष्यातला एक दिवस 

सकाळी बायको आजच्या पेपरावर बसलेला
कालच्या बनीयनचा बेंबीतला सुताचा बोळा उडवत
वाचून दाखवते मोठमोठ्याने
आजच्या पेपरातला ‘पॉझिटीव्ह थिंकिंग’चा लेख
आपलंच काहीतरी चुकतंय अशा रोखात 

रंग उडालेली ब्रँडेड पँट घरात वापरायला काढून
मी समारोप करतो या विषयाचा
आणि जुन्या पँटचे उसवलेले खिसे
टीप मारायला टाकतो

Friday, November 02, 2012

तेव्हा अख्खी वहीच असायची डोक्यात कवितांची


तेव्हा अख्खी वहीच असायची डोक्यात कवितांची

एका ओळीत गर्दी करून असायचे शब्द श्वासांसोबत 

उभा जन्म भरून पावायाचा
शब्दांतून रितं होत जाताना

नि वाटायचं सगळ्या जगाला आपण देत आहोत मंत्र
सुखी होण्याचा

तेव्हा रोज व्हायचीच
सकाळ दुपार संध्याकाळ रात्र

तेव्हा असायचे
उन वारा पाउस थंडी

तेव्हा दिसायचे रंग
काळे-पांढरे गडद-फिके

तेव्हा कळायचे नाहीत कशाचेच नेमके अर्थ

तेव्हा किती सहज व्हायचे अर्थाचे अनर्थ

पण तेव्हा वाटायचं नाही काहीच व्यर्थ
आत्तासारखं

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...