Sunday, February 07, 2016

इतका आहे लळा

इतका आहे लळा तरीही झाले आहे नको नको
मी जगण्याला, जगणे मजला करते आहे नको नको

जो तो मजला सांगून जातो काळ चालला पुढे पुढे
इकडे साधी वेळ गाठण्या होऊन जाते नको नको 

पैशाने या आणली असती किती सुखे मी दाराशी
जुने जीर्ण हे दुखणे कण्हते त्यात विकतचे नको नको

कितीक डोंगर उलटून आलो सखे तुझ्या मी दाराशी
उम्ब्र्याशी तू येऊन म्हणतेस आत्ता काही नको नको

घेऊन बसलो रात्र उशाशी उगाच स्वप्नाला घरघर
स्पप्नच म्हणते झोपेला या जा बाई तू नको नको

भेटतात हे लोक जरासे, बोलतात, देती टाळ्या
मीच मला भेटाया करतो दहा दहादा नको नको

आता वाटे उगाच तेव्हा तडफड केली जगण्याची
बसलो असतो असाच आणि म्हंटले असते ‘नको नको’

एक वाट ही आहे अजुनी नेते मजला पुढे पुढे
पायांमधले काटे बोथट करती मजला नको नको

हृदयामध्ये विहीर आहे खोलखोलशी भीतीची

पणती विझते आणिक होते आत उतरणे नको नको 

No comments:

Post a Comment

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...