Friday, December 31, 2010

पुन्हा निरक्षर...

पुन्हा निरक्षर होता आलं असतं
तर बरं झालं असतं...

मुळाक्षरांच्या बुबुळात बुबुळे घालून
संवेदना हरवून गेल्यात जगण्याच्या...
डोळ्यांना दिसते आहे म्हणून फ़क्त...?
मेंदूचं काम थंडच... कित्येक दिवस.

वृत्तपत्रे अन माध्यमांच्या
आवाजाला म्हणतो आहे
माझा आवाज...माझं ज्ञान

या मुळाक्षरांनी दाखवली खरी
डोंगरापलीकडची घळ.
पण ओळी ओळीतून
मला बसवलच
काचेच्या घरात...


वाचून वाचून डोळे आगावले
नि लिहून लिहून बोटे निर्जिव...
पण ना टाळी लागली कुठे...
ना दंगलीत फेकला गेलो आपोआप...
घृणेची थूंकी टाकत राहिलो
आपली कमी पडू नये म्हणून.


आता बाहेर पडलो तरी
असेलंच सोबत

या अक्षरांची सावली त्यांचे डाग...
व्यक्त होण्याच्या निलाजस सवयी


खरच पुन्हा निरक्षर होता आलं असतं तर...?

Friday, December 17, 2010

तिला वाटले...




ही कविता संगितबद्ध केली असून त्याची यू ट्यूब वरील लिंक जोडतो आहे.


तिला वाटले तिच बरोबर...
मला वाटले चुकलो मीच...
......................
......................

एक कुणीशी होती माझी
माझ्याहूनही माझी माझी
नव्हते काही वेगवेगळे
वाट एक ती तिची नी माझी

शपथा होत्या उधाणलेल्या
स्वप्ने होती अंकुरलेली
मन्मनातील फुले बावरी
अलगद होती सावरलेली

सरल्या वाटा अवखळ-अनघट
सरली वळणे अवघडशी
काळ जरासा पोक्त जाहला
नवलाई अन अवजडशी

तशी अचानक उल्केपरी त्या
म्हंटली होती मजला ती
"प्रेम नि माया झूठच सारे
फसवी सारी ही नाती"

"पाण्यासम त्या व्हावे जगणे
वा-यासम त्या गावे गाणे "
आणि म्हणाली, "किती बंध हे
रोज तेच ते येणे-जाणे"

क्षणभर थरथर पडते अंतर
दूर उभा मी बघताना...
प्रेमामधले शब्द तिचे ते
जखमेपरी त्या जपताना...

हाय! "सखे तू असो सलामत"
दुवा देत ही जगतो आहे...
तसाच वारा तसेच पाणी
रोज नव्याने बघतो आहे...

तिला वाटले तिच बरोबर...
मला वाटले चूकलो मीच
उमगून येता गत फसवी ही
माझ्यावरती हसलो मीच...
kamalesh kulakarni

Tuesday, December 07, 2010

प्रपोज

प्रपोज १
"तु मला मित्र म्हणून आवडतोस पण...
मी तुझा त्या दृष्टीनं
कधीच विचार केला नाहीये.
प्लिज राग मानू नकोस "

प्रपोज २
"तुला वाटतं तितकं सोपं नाहीये माझं.
अजून तू माझ्या ताईला आणि बाबांना
ओळखत नाहीस."

प्रपोज ३
"तु चांगला आहेस रे ... पण
माझ्या बाबांनी खूप कष्टात दिवस काढलेत
आता त्यांना आम्हाला सुखी पहायचय...
मी त्यांच्या अगेंस्ट नाही जाऊ शकत."

प्रपोज ४
"थांब. आत्ता नको.
घरात माझ्या लग्नाचा विचार चालू झाला की
मी दुसरं कुठलाही स्थळ बघण्यापूर्वी
तुझंच नाव सुचविन. इतकं नक्की."

प्रपोज ५
"व्वा... आहे का आठवण?
म्हणे लग्न करायचय.
माझी किंमतच नाही तुला.
सारखं काय काम काम काम?
इतका पैसा पैसा केलेलं
मला नाही आवडणार बुवा.

प्रपोज ६
ए एक विचारू ?
- मी का आवडते रे तुला?
- माझ्यासारखीच यापूर्वी कुणी? "

प्रपोज ७
"खोटं खोटं खोटं
सगळ्यांसारखेच आहेत
माझे डोळे माझे केस माझे ओठ
एक सांगू? तू नवरा म्हणून
छान वाटतोस मला."

प्रपोज ८
"ए इतके नॉन-व्हेज मेसेजेस
नको पाठवूस न...
चूकुन बाबांच्या हातात
मोबाईल पडला तर...?"

प्रपोज ९
मला खूप भीती वाटततेय रे ...
नुसत्या एका किसवर थांबणारे का?
पण भेटायचं कुठे?
आणि हो एकच किस हं? प्रॉमिस?

प्रपोज १०
"नको... थांब... प्लिज...बास...
खुप पुढे जाऊ नकोस
भीती वाटतेय...
आई-बाबांना फ़सवतेय असं वाटतय.
ऊं. थॅंक्स. छान वाटतय..."

प्रपोज ११
"आता जरा जपूनच रहावं लागेल.
बाबांना शंका होतीच.
तुझ्याशी काँटॅक्ट तोडायला सांगितलाय.
तुझ्याविषयी सगळी चौकशी केली त्यांनी.
खुप अवघड झाल्यात गोष्टी...
- तु सेटल हो लवकर...
घर, गाडी. म्हंजे मला नीट बोलता येईल."

प्रपोज १२
"आज घरी एकटीच आहे.
लग्नाला गेलेत सगळे.
येना लवकर."

प्रपोज १३
"बाबांनी एक स्थळ आणलय.
मुलगा युएस चा आहे."

प्रपोज १४
"मी तुला गुंतवलं?
मी पहील्यापासूनच क्लियर होते
बाबा आणि ताईच्या अगेंस्ट जाणार नाही म्हणून.
माझ्या जागी दुसरी कुणी असती तर ...
विचार तरी केला असता का तुझा?"

प्रपोज १५
"खुप छान वाटतं रे तुझ्या कुशीत
असं वाटतं अशीच रहावी ही मिठी.
पण आपण हे थांबवायला हवं...
उद्या माझ्या होणा-या नव-याला
मी कसं सामोरं जाऊ?
सांगते ते ऐक न प्लिज
तू पण लग्न कर...
मिळेल तुला माझ्याहून छान बायको
मी शोधू का?"

Saturday, November 27, 2010

आता भेटलो तर....

आपल्याला माहीत होतच
पहिल्यापासून की शक्यतो
आपलं लग्न होणं
अवघड आहे ...

पण तरी आपण
जगाची नजर चूकवून
भेटत राहीलो
जणू की आपल्य़ाला
हेही माहीत होतं की शक्यतो
लग्न वेगळं अन हे वेगळं ...

मिळालेल्या संधीचे नि काळाचे
आपण धनी झालो
पण जाता जाता
एकमेकांच्या मनावर
वळ उमटवत गेलो ...

आपल्याला माहीत असल्यासारखे
की अशा
जखमा केल्याशिवाय
पुरतं दूर होणं
शक्यच नव्हतं म्हणून...

आज याच शहरात
वावरतो आहोत
आपण दोघे...

दोघांच्याही मनात
रोजरोज तिच आंदोलन...
एकमेकांविषयीची...


पण आता दोघांच्याही
मनाचे मालक
वेगवेगळे

योगयोगानं रस्त्यात
दिसतोही आपण
एकमेकांना
पण दोघेही
टाळून जातो
एकमेकांची नजर...
मनाची वळणे ...

दोघांनाही पक्क
ठाऊक असल्यागत की
आता भेटलो तर....

Wednesday, November 10, 2010

पाऊस

पुन्हा एकदा मनात माझ्या आला पाऊस
तुझी आठवण गुदमरली अन झाला पाऊस


क्षितीज कुठेसे हरवून बसले आहे माझे
डोळ्यांमध्ये उगाच ना सापडला पाऊस



खुप मारल्या हाका पण तू वळली नाहीस
भर पावसातूनी निघोनी गेला पाउस


मला एकटा पाहून त्याने कहर केला
तिच्या घराच्या आत अचानक शिरला पाऊस


एक बरे की ढगा तुला ही खिडकी आहे
विरहाच्या बेरंग क्षणांतून रंगला पाऊस


 
कमलेश

Monday, November 08, 2010

प्रेम

तिच्या कॉस्मॅटिक अदांवर
मी करत राहिलो
आयुर्वेदिक प्रेम

मला जाणवायचं
तिचं प्लॅस्टिक स्माईल
पण साला माझा रागही
इकोफ्रेंडली

कॅटबरी, केक्स, गिफ्ट्स मधून ती
जपू पहायची नाँनस्टीक नातं

आणि तरीही मी
राखायचो निगा
तिनं दिलेल्या एकेक
जखमेची- अश्रुंची
रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखी....

: कमलेश

Saturday, October 30, 2010

अपूर्ण

खरं तर मला
काहीच म्हणायचं नव्हतं कधीच...
पण म्हणून बसलो.
जसं की तिला
प्रपोज करून बसलो...


मग देत राहिलो उगाचंच
समर्थने स्व-कृत्याची.
जसं की देत राहिलो
ती का आवडते वगैरेची...


मला जे म्हणायचय
ते कितीतरी लोक

म्हणून बसलेत आँलरेडी.
खर तर मी त्यांचेच शब्द चोरून बोलतोय
स्वतःचे असल्याच्या थाटात.
ऎकणारे ऎकतात...
जसं की ती ऎकते...


मग मी खरा की खोटा?
शोध शोध शोधूनही
सापडत नाही मलाच.
उत्तर अपूर्णच याही प्रश्नाचं
जसे की तिचे डोळे...
दाद लागू न देणारे...
अपूर्ण...
आणि म्हणूनच मला ते
माझे अगदी माझे वाटणारे...

-कमलेश कुलकर्णी

Saturday, October 23, 2010

मुंगळे

सगळेच हात हालवत निघलो शहराकडं
बापाचं गठूडं असल्यागत


पटापट चिकटलो गुळाला
मुंगळ्यांचा धर्म पाळीत
ढेपा बदलत राहील्या
पण आम्ही मुंगळेच
रांगेतल्य़ा शिस्तीतले


कुणास ठाऊक ही ढेप
गावच्या मातीतल्या ऊसाची
तर नसेल?


आणि ते खरोखरीचे मुंगळे
ते तर आपल्या बिळांत
आन्नाचा खुप साठा
करून ठेवतात म्हणे
च्यायला आपल्याला

तेही जमलं नाही।

आता गावात परतायचं म्हंटलं तरी
हात हालवतचं जावं लागेल.
गठूडं संपल्यागत


त्यापेक्षा इथेच राहू
मुंगळे बनून
रांगेतल्या शिस्तीतले.

Friday, October 15, 2010

लँमिनेट

"आपण ब्राम्हण आपण ब्राम्हण"
असं समजावत
सगळी कातडी
लँमिनेट
करून टाकली
मोठं होईपर्यंत घरातून

बाहेरच्या बाहेर धुता येतील
इतकेच शिंतोडे
उडायला हवेत स्वत:वर
दटावून सांगत राहीले संस्कार

"आपण कसे श्रेष्ठ
आपण कसे उच्च "
अशी वाक्ये
दबक्या आवाजातच
पोहोचली कानात
अन आंबेडकर - फ़ुल्यांवरची भाषणं
ताठ मानेनं चढ्या आवाजात
सांगत
छाती फ़ुगवून घेतली
शाळाभर ...

शेजारच्या मुलाच्या
अंगाचा वासही
वाटायचा जातीय
पण त्याचा पीळदार स्नायू
कुठल्या जातीत राहून तयार झालाय
हे सांगितलं नाही कुणीच

ताटात हात धुतल्यावर
कानशिलात खायचो वडलांची
म्हणायचे, " याद राख पुन्हा
असा अन्नाचा अपमान करशिल तर..."
पण
"चिकन मटण खाणा~या
मुलांच्या बैठकीत बसायचं नाही
खायला शाळेत "
बजावून पाठवायचे
जणू की ते अन्नच नाही।

आता कुणाच्याही
खांद्याला खांदा लावून
काम करतो झकत

पण कातडीवरच्या
या लँमिनेशनपाई
कष्टाच्या घामाचा
अन शरीराचा
खराखुरा वासही
येईनासा झालाय.

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...