Tuesday, December 27, 2011

कचकच



दार उघडच दिसलं किलकिलं म्हणून
बेल न वाजवताच आत शिरलो

इलेक्ट्रॉनिक तंबो-याचा सूर धरलेल्या बासरीचा राग
घुमत होता हॉलभर
हॉलमध्ये एक टीव्ही
टीव्हीवर चहाचा उष्टा कप, एक पेला अन् एक खरकटी डिश
बाजूला धूळ अनेक वर्तुळांची
एक दिवाण त्यावर उशी,
उशीवर घडी न केलेलं पांघरूण आणि आजचा पेपर
सोबत दोन जाडजूड पुस्तकं आणि थोडं सांडलेलं खरकटं

असच कुठे कुठे काय काय अस्ताव्यस्त
बॅट, गिटार, रद्दी, बॅगा, चपला, पाच-दहा वायारींचा गुंता
रंग उडालेल्या काळवंडलेल्या भिंती आणि
पायाशी जाडसर कचकच.

आणि बासरीत बुडालेल्या काकांना
मी आल्याचंही कुठे कळलं?
व्यत्यय नको म्हणून
लेदरच्या सोफ्यावरचा टॉवेल बाजूला सारून बसलो तोच
सोफ्याचा कुईकुई आवाज झाला अन्’
बासरी थांबली.
काकांनी डोळे उघडले
ते हसले मी हसलो
काकांनी हाक मारली “पक्याऽऽऽ...”
मी म्हटलं; “कामात असेल तर...”

एका खोलीचं दार उघडलं पक्यानं आत बोलावलं
आत. पक्यानं हात जोडले पोथीला आणि पुटपुटला,
“गजानन महाराजांचं पारायण चालू आहे. पटकन संपवतो तोवर थांब.”
मी ह्म् केलं.
पक्या हात जोडून चालू झाला
या खोलीत चार दो-यांवर कपडे लटकत होते.
खिडकीच्या कठड्यावरच्या धुळीवर भरमसाट गोळ्या-
कॉम्बीफ्लेम, त्रिफळा, ब्राह्मी, एकांगवीर, क्रोसिन, होमियोपॅथी.
कपाटात कडेला जपमाळ, काढे सोबत शनीमहात्म्य,
टेबलावर सीडी प्लेअर, सीडीची उघडी कव्हरं, औषधांच्या बाटल्यांची झाकणं खाली ‘मनाचे श्लोक’
उदबत्तीचा दरवळ - औषधांचा भपकारा
पायाखाली कार्पेट आणि
कार्पेटवर जाडसर कचकच

मला बोअर झालं त्यापेक्षा काकांची बासरी बरी
मग बाहेर आलो. उभा.
काका तल्लीन, बेमालूम त्यात हरकती अचाट खर्ज्यातल्या

आत काहीतरी हालचाल होतेय म्हणून दुस-या खोलीकडं वळलो
खोलीत काकू थरथरत पाण्याच्या तांब्याकडं पाहत अस्वस्थ
मी पेला भरून तोंडाशी धरला त्या एक घोट घेऊन थांबल्या

मागच्यावेळीपेक्षा पारच खपाटीला गेल्यात काकू
त्यांचं कण्हणं आता बाहेर ऐकू येईनासं झालय.
त्या नेमक्या काय विचार करत असतील ठाऊक नाही.

पक्या आला म्हणाला; “हां बोल. काय म्हणताहेत आमचे बंधुराज?”
मी- “ रोज मेल येतो त्याचा. आई कशीय? बाबा कसेत? जाऊन ये. वगैरे.      गेल्या आठवड्यात जमलं नाही. आज आलो. ”  
पक्या- “तुझं कुठपर्यंत आलं अमेरिकेचं?”
मी- “बोलणी चालू आहेत. बघू.”
पक्या- “पैशाचं काही कळवलंय का त्याने ??”
मी- “हम्. निरोप दिलाय. जरा तंगी आहे पण पुढच्या महिन्यापर्यंत करतो म्हणून ”
पक्या- “काय होणारे आमचं गजाननालाच ठाऊक? ”

काकू बारीक कण्हत होत्या आणि
काका टिपेची बासरी लावत होते सुरात
मी बाहेर पडलो. श्वास मोकळा झाला.
तरी चालताना टोचत होती तळव्यांना चिकटलेली
पक्याच्या घरातली कचकच.    

3 comments:

  1. एक विदारक चित्र!

    ReplyDelete
  2. आज प्रथमच तुमचा ब्लॉग बघितला. मस्तच लिहिलंय. मी सहसा कवितांच्या वाटेला जात नाही म्हणून हुकला होता बहुतेक इतके दिवस.

    ReplyDelete
  3. :) गौरीजी तुम्ही 'वाट चुकवून' माझा ब्लॉग वाचलात त्यासाठी आभारी.

    ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...