Saturday, October 30, 2010

अपूर्ण

खरं तर मला
काहीच म्हणायचं नव्हतं कधीच...
पण म्हणून बसलो.
जसं की तिला
प्रपोज करून बसलो...


मग देत राहिलो उगाचंच
समर्थने स्व-कृत्याची.
जसं की देत राहिलो
ती का आवडते वगैरेची...


मला जे म्हणायचय
ते कितीतरी लोक

म्हणून बसलेत आँलरेडी.
खर तर मी त्यांचेच शब्द चोरून बोलतोय
स्वतःचे असल्याच्या थाटात.
ऎकणारे ऎकतात...
जसं की ती ऎकते...


मग मी खरा की खोटा?
शोध शोध शोधूनही
सापडत नाही मलाच.
उत्तर अपूर्णच याही प्रश्नाचं
जसे की तिचे डोळे...
दाद लागू न देणारे...
अपूर्ण...
आणि म्हणूनच मला ते
माझे अगदी माझे वाटणारे...

-कमलेश कुलकर्णी

Saturday, October 23, 2010

मुंगळे

सगळेच हात हालवत निघलो शहराकडं
बापाचं गठूडं असल्यागत


पटापट चिकटलो गुळाला
मुंगळ्यांचा धर्म पाळीत
ढेपा बदलत राहील्या
पण आम्ही मुंगळेच
रांगेतल्य़ा शिस्तीतले


कुणास ठाऊक ही ढेप
गावच्या मातीतल्या ऊसाची
तर नसेल?


आणि ते खरोखरीचे मुंगळे
ते तर आपल्या बिळांत
आन्नाचा खुप साठा
करून ठेवतात म्हणे
च्यायला आपल्याला

तेही जमलं नाही।

आता गावात परतायचं म्हंटलं तरी
हात हालवतचं जावं लागेल.
गठूडं संपल्यागत


त्यापेक्षा इथेच राहू
मुंगळे बनून
रांगेतल्या शिस्तीतले.

Friday, October 15, 2010

लँमिनेट

"आपण ब्राम्हण आपण ब्राम्हण"
असं समजावत
सगळी कातडी
लँमिनेट
करून टाकली
मोठं होईपर्यंत घरातून

बाहेरच्या बाहेर धुता येतील
इतकेच शिंतोडे
उडायला हवेत स्वत:वर
दटावून सांगत राहीले संस्कार

"आपण कसे श्रेष्ठ
आपण कसे उच्च "
अशी वाक्ये
दबक्या आवाजातच
पोहोचली कानात
अन आंबेडकर - फ़ुल्यांवरची भाषणं
ताठ मानेनं चढ्या आवाजात
सांगत
छाती फ़ुगवून घेतली
शाळाभर ...

शेजारच्या मुलाच्या
अंगाचा वासही
वाटायचा जातीय
पण त्याचा पीळदार स्नायू
कुठल्या जातीत राहून तयार झालाय
हे सांगितलं नाही कुणीच

ताटात हात धुतल्यावर
कानशिलात खायचो वडलांची
म्हणायचे, " याद राख पुन्हा
असा अन्नाचा अपमान करशिल तर..."
पण
"चिकन मटण खाणा~या
मुलांच्या बैठकीत बसायचं नाही
खायला शाळेत "
बजावून पाठवायचे
जणू की ते अन्नच नाही।

आता कुणाच्याही
खांद्याला खांदा लावून
काम करतो झकत

पण कातडीवरच्या
या लँमिनेशनपाई
कष्टाच्या घामाचा
अन शरीराचा
खराखुरा वासही
येईनासा झालाय.

Friday, May 28, 2010

तू कुठे ?

मी कुठे आणि आता तू कुठे ?
राहीले न आपले ऋतू कुठे


जरी नवेच शब्द रोज सोबती
परी मनास मी रीता करू कुठे ?


आरशास रोज रोज सांगतो
आरजू कुठे आता आबरू कुठे


कुठे कुठे तुझी नभे तुझ्या दिशा
एकट्यासवे आता फ़िरू कुठे ?


आँख आज अश्कसे भरी हूई
जीतेजी मौत है सजू कुठे ?


: कमलेश कुलकर्णी

तोडगा

असं वाटतं
तिचा खुन करावा किंवा
मोक्याच्या क्षणी आत्महत्या करावी.
त्या शिवाय कठीण आहे ही आसक्ती जाणं...


वाटतं ...
तोडून-मोडून टाकावं सगळं जग
भुकंप व्हावा जोरदार
माणूस नि माणूस मरून जावा इथला
उरो ती आणि मी फ़क्त...


पण बायकोच्या
प्रेमळ, आसुसलेल्या डोळ्यांकडं पाहून
घ्रूणा येते माझी मलाच.
वाटतं बायकोलाच सुखी ठेवावं
क्षण न क्षण
तिच्या जागी हिला पहावं
आणि त्यातूनच देत रहावी दुवां
ती सुखात राहण्याची ...
अन तिनेही करावं असंच.
ओलांडत जावेत खाचखळगे
दुवां घेता घेता ...
कुठल्याही भेटीविना ... शब्दाविना ...


: कमलेश कुलकर्णी

Tuesday, May 25, 2010

तसे खुपदा

तसे खुपदा सावरले मी
मनास माझ्या आवरले मी


कुठे तिच धुन ऎकू येता
पुन्हा एकदा बावरले मी


आता एक सल शांत जाहली
जरी कितीदा गहिवरले मी


अशी प्रित ना व्हावी कोठे
मिटूनी वाटे डवरले मी


:कमलेश कुलकर्णी

खरखर

तिचं आणि माझं
नातं म्हणजे
रेडिओवरचं स्टेशन झालय...


जिथून पुढे सरकलो की
तिची खरखर आणि
मागे सरकलो की
माझी....

काहीतरी

इतुके बोलुन होते तरीही
राहून जाते काहीतरी
पुन्हा भेटशील तेव्हा सांगेन
तुला नव्याने काहीतरी


डोळ्यांमधले अर्थच म्हणती
निशब्दांच्या डोळ्यांना
मलाही थोडे राहू द्या ना
सांगायाला काहीतरी


विश्चासाच्या धुक्यात सरल्या
अवघ्या वाटा कुजनाच्या
मधूनच थोडे मौन पाळले
अर्थासाठी काहीतरी


सांगत होतो ओठांनाही
असते भाषा मधूर अशी
तव ओठांनी तू म्हंटली होती
"तुझे आपले काहीतरी"


झाले बोलून गेलो बोलून
आत आतले गुपीत असे
तुलाच ठाऊक आहे सारे
इतुकेच गुपीत मग काहीतरी


: कमलेश कुलकर्णी

सल

आपल्याला आजही
अक्षम्य वाटतात त्यांच्या
’न’ आणि ’ण’ च्या उच्चारातील
व्याकरणात्मक चूका...

ते आयुष्यभर मागत राहीले
"पानी पानी" हक्काचं
शेवटी त्यांनी आपल्या
रक्ताचंच पाणी केलं
आणि जे व्हायला हवं होतं
तेच झालं .

पण आपण आजही
सोडत आहोत
आपल्या प्रव्रूत्तींचे
टोकदार बाण
त्याच लक्षावर
व्याकरण चालवून...

ते घायाळ होऊन
पानीच मागताहेत हक्काचं
आणि त्यांच्या
उच्चारातला ’न’
आप्ल्याला फ़ार
खोलवर सलतो आहे

: कमलेश कुलकर्णी

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...