Friday, November 04, 2011

परवा मेली बरका कविता

परवा मेली बरका कविता
थकली होती; खचलीही होती
डोळ्यांत उघडं आकाश ठेऊन
मुठीत थोडी माती घेऊन
शांत सहज गेली कविता।




जुनंच खोड ते भलतं काटक
-रानावनात घडलेलं, डोंगरद-यांत घुमलेलं,
उन्हातान्हात काट्याकुट्यात
अनवाणी फिरलेलं.




हसतमुख होतं तसं गूढही होतंच
उगा गेली नाही कुणाच्या वाट्याला
पण तिच्या वाटेत जे जे आले
ते सरले बुवा आपसूक मागे




तिच्या झोळीत गोटा होता की काय
ते कळलं नाही.
- आणि आताशा तर ती झोळीही दिसत नाही. असो.



पण म्हातारी सुटली एकदाची.
ते बरंच झालं.
तसे म्हणायला सगळे सोयरेच इथे
तिचं नाव घेतल्याशिवाय
कुणाचा दिवस गेला नाही खरा
पण ...
दिवसेंदिवस हाडं वर येत चालल्याचं कळत होतं.
उपाशी पोट तगणार तरी किती ?




गावातला येडा तुक्या तरी
तिला द्यायचा भाकर रोज.
-स्वतः अर्धपोटी राहून.
काय जमलं होतं त्यांचं
ठाऊक नाही;
पण तो आला की ती
उघडून ठेवायची सगळी झोळी त्याच्या पुढ्यात
अन् तो नाचायचा खुशाल एकतरी लावून.



लोक गमतीनं पाहायचे
सोयीनं ऐकायचे
धोरणानं बोलायचे त्यांच्याबद्दल.
पण भाकरी दिली नाही काढी कुणी
ना त्याला ना तिला.



एक दिवस तुका
चालता बोलता देवाघरी गेला.
त्या दिवशी पहिल्यांदाच
त्या म्हातारीच्या त्या कवितेच्या
डोळ्यांत पाणी होतं.
पण टाहो नव्हता. खंत नव्हती. शब्दही नव्हते.
होती ती शांतता आणि गुढता.



तुका गेला म्हणून म्हातारी इतक्या लवकर जाईल
असं वाटलं नव्हतं.
बाकी आता गावगाडा चालू आहे
आहे तसाच.
जरा कलकलाट वाढलाय आणि
देवाच्या गाभाऱ्याला नवीन चकचकीत कुलूप आणून लावलाय
इतकंच...!

2 comments:

  1. "लोक गमतीनं पाहायचे
    सोयीनं ऐकायचे
    धोरणानं बोलायचे त्यांच्याबद्दल."
    आईशप्पथ...

    ReplyDelete
  2. सत्याच एक वेगळ दर्शन ..आवडली कविता ..

    ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...