Tuesday, December 27, 2011

कचकच



दार उघडच दिसलं किलकिलं म्हणून
बेल न वाजवताच आत शिरलो

इलेक्ट्रॉनिक तंबो-याचा सूर धरलेल्या बासरीचा राग
घुमत होता हॉलभर
हॉलमध्ये एक टीव्ही
टीव्हीवर चहाचा उष्टा कप, एक पेला अन् एक खरकटी डिश
बाजूला धूळ अनेक वर्तुळांची
एक दिवाण त्यावर उशी,
उशीवर घडी न केलेलं पांघरूण आणि आजचा पेपर
सोबत दोन जाडजूड पुस्तकं आणि थोडं सांडलेलं खरकटं

असच कुठे कुठे काय काय अस्ताव्यस्त
बॅट, गिटार, रद्दी, बॅगा, चपला, पाच-दहा वायारींचा गुंता
रंग उडालेल्या काळवंडलेल्या भिंती आणि
पायाशी जाडसर कचकच.

आणि बासरीत बुडालेल्या काकांना
मी आल्याचंही कुठे कळलं?
व्यत्यय नको म्हणून
लेदरच्या सोफ्यावरचा टॉवेल बाजूला सारून बसलो तोच
सोफ्याचा कुईकुई आवाज झाला अन्’
बासरी थांबली.
काकांनी डोळे उघडले
ते हसले मी हसलो
काकांनी हाक मारली “पक्याऽऽऽ...”
मी म्हटलं; “कामात असेल तर...”

एका खोलीचं दार उघडलं पक्यानं आत बोलावलं
आत. पक्यानं हात जोडले पोथीला आणि पुटपुटला,
“गजानन महाराजांचं पारायण चालू आहे. पटकन संपवतो तोवर थांब.”
मी ह्म् केलं.
पक्या हात जोडून चालू झाला
या खोलीत चार दो-यांवर कपडे लटकत होते.
खिडकीच्या कठड्यावरच्या धुळीवर भरमसाट गोळ्या-
कॉम्बीफ्लेम, त्रिफळा, ब्राह्मी, एकांगवीर, क्रोसिन, होमियोपॅथी.
कपाटात कडेला जपमाळ, काढे सोबत शनीमहात्म्य,
टेबलावर सीडी प्लेअर, सीडीची उघडी कव्हरं, औषधांच्या बाटल्यांची झाकणं खाली ‘मनाचे श्लोक’
उदबत्तीचा दरवळ - औषधांचा भपकारा
पायाखाली कार्पेट आणि
कार्पेटवर जाडसर कचकच

मला बोअर झालं त्यापेक्षा काकांची बासरी बरी
मग बाहेर आलो. उभा.
काका तल्लीन, बेमालूम त्यात हरकती अचाट खर्ज्यातल्या

आत काहीतरी हालचाल होतेय म्हणून दुस-या खोलीकडं वळलो
खोलीत काकू थरथरत पाण्याच्या तांब्याकडं पाहत अस्वस्थ
मी पेला भरून तोंडाशी धरला त्या एक घोट घेऊन थांबल्या

मागच्यावेळीपेक्षा पारच खपाटीला गेल्यात काकू
त्यांचं कण्हणं आता बाहेर ऐकू येईनासं झालय.
त्या नेमक्या काय विचार करत असतील ठाऊक नाही.

पक्या आला म्हणाला; “हां बोल. काय म्हणताहेत आमचे बंधुराज?”
मी- “ रोज मेल येतो त्याचा. आई कशीय? बाबा कसेत? जाऊन ये. वगैरे.      गेल्या आठवड्यात जमलं नाही. आज आलो. ”  
पक्या- “तुझं कुठपर्यंत आलं अमेरिकेचं?”
मी- “बोलणी चालू आहेत. बघू.”
पक्या- “पैशाचं काही कळवलंय का त्याने ??”
मी- “हम्. निरोप दिलाय. जरा तंगी आहे पण पुढच्या महिन्यापर्यंत करतो म्हणून ”
पक्या- “काय होणारे आमचं गजाननालाच ठाऊक? ”

काकू बारीक कण्हत होत्या आणि
काका टिपेची बासरी लावत होते सुरात
मी बाहेर पडलो. श्वास मोकळा झाला.
तरी चालताना टोचत होती तळव्यांना चिकटलेली
पक्याच्या घरातली कचकच.    

Thursday, November 24, 2011

साहब, आप चलो न हमरे घरको।


- " साहब, आप चलो न हमरे घरको।
दो-चार रोज मजा करेंगे।"

- "आ सकता हूं हरीषभाय,
लेकिन डर लगता है।
अगर गांववालोंको पता चला के मैं महाराष्ट्रसे आया हूं तो...? "

- "अरे क्या साब? हमरे गावके लोग इधर जैसे नहीं है।
दिन-रात आपका खयाल रखेंगे।
आयोध्या मंदिर घुमायेंगे। नदियां नहायेंगे।
लेकीन कोई आपको हाथ लगाने की सोचेगाभी नही साहऽऽब. कसमसे."

- "एक बात बताओ;
इधर जब तुम्हारे विरुद्ध आंदोलन उठता है
तो तुम क्या करते हो?"

- "क्या करने का साब,
दो-चार दिन चुपचाप बैठने का...
बाहर किसीसे कोई बात नहीं करनेका। और क्या ?"

- “गांवसे घबराके बीबीका फोन नहीं आता घर आओ बोलके ?”

- “आता है न साब| मगर क्या करें ?
काम छोडके घर थोडेही बैठ सकते है?
दंगा फसाद तो दो-चार दिन की बात रहती है|
सचमुच साब चलो न एकबार ”

- “अरे अभी नहीं| फिर कभी पक्का|
अभी तो दिवाली मनायेंगे| फटाके फोडेंगे|”

- “क्या साब ?
एक बार हमारीभी दिवाली देखो|
हमारे यहां आप जैसी खिलौनोकी पिस्तौल नहीं होती
वोह क्या बोलते है आप?
‘कट्टा कट्टा’ उसमें छर्रे भरनेका और हवामे उडानेका| बस्स|
पुरे गावमे जश्न होता है जश्न|

चलो न साहब ... हमारे घरको| ”

Monday, November 21, 2011

तुझ्यावरची कविता

१
ये तुला उलगडून दाखवीन
तुझी एक कविता.
तू करशील स्पर्श एकेक अक्षराला
जी तयार झालीयेत फक्त आपल्याच लीपीने.
तू फिरवशील बोट
भूतकाळातून ठिपकलेल्या नितळ दवावर.
तूच बोलून गेली होतीस ओघानं
"माझ्यावर लिही नं एकदा कविता"
तेव्हा पासुनचाच हा प्रवास आतल्या वळणाचा.
२
कविता सुचलीय खरी
पण शब्द नाहीसे झालेत समजून उमजून.
आपल्या दोघांत उगाच शब्दांची अडचण नको म्हणून.
अन् तसंही तूच लिहायाचीस काविता आपल्यांत शब्दांशिवाय.
मी नेणीव-जाणिवेच्या काठावर. तंद्रीत.
३
तू कोण? मी कोण?
कविता कोण?
हे प्रश्न मुळाचे. आदिम-अनादी.
भरात आलेला भुंगा आणि
कह्यात आलेलं फुल
कविते वाचून राहूच शकत नाही.
ते भविष्य घेऊन
भूतकाळ पेरीत जाणारच. संदर्भासहित.
अन् मुळाचं सांगायचं तर
ते प्रश्नांशिवाय जगूच शकत नाही.
अन् आपण प्रश्नांसहीत.
आठवतंय?
आपण आपले कितीतरी प्रश्न टाळून
बसून राहायचो मुळाशी निवांत.
म्हणूनच होत राहिल्या आपल्यांत कविता.
४
अन् आठवतंय?
तू दिली होतीस एक कोरी वही
’सप्रेम भेट’ न लिहिता .
मला हव्या त्या मजकुराची मुभा देऊन.
अन् तेव्हाही मी भरवून टाकली होती एकेक ओळ.
शब्दांशिवाय.
तर तीच तुझी आवडती कविता झाली होती.
५
आता त्याच वहीत तेच शब्द
गिरवून दृष्यं करायचे म्हंटले तरी
अर्थाचं काय?
पुन्हा लागेल तुला तोच अर्थ तंतोतंत ?
की तुला देऊ करायचेत नवे अर्थ?
पण पुन्हा तू बोलणार अशी काहीच नाहीस त्याही वेळी.
मी गिरवून मोकळा झालो तरी.
हे मलाही माहिती आहे
यापैकी आता काहीच होऊ शकत नाही.
पण एक जाणवतंय
आपण याही वेळी जन्म देतोय नव्या कवितेला. शब्दांपार.
तू आलीस की दाखवीन उलगडून
तुझी एक काविता.

Friday, November 18, 2011

तोवर

तू अन् मी
मध्ये वगैरे वगैरे.
दोघांचेही तळहात एकमेकांवर जुळवत राहायचो आपण
पण जुळायचे नाहीत कधी.
दरम्यान स्पर्श होत राहिले.
चुटपुटते किंवा घट्ट
पत्रिका, भविष्य, तळहातांच्या रेषा
न बघताच आपण तुटत गेलो एकमेकांपासून
तेही फार बरं झालं.
हा अखंड श्वास मरेपर्यंत
कुणाच्या तरी नावावर लिहिला जाऊ शकतो
कुठल्याही हेतुशिवाय.
हे माहितीच नव्हतं मला तोवर.

Thursday, November 17, 2011

या शांततेत

मनात आत्महत्येचा विचार करत
मी सावरतोय तोल गाडीचा
भर रस्त्यात.
या अवाढव्य गोंगाटात
आपलंच मौन किती सलतंय आपल्याला.

माझी असह्य तिडीक जराही लक्ष देत नाहीये
आजूबाजूच्या गर्दीकडे.
आज काय तो सोक्ष-मोक्ष लावायचाय एकदाचा
मिटवून टाकायचेत सगळे रोजमर्राचे प्रश्न.

सिग्नल पडलाय मध्येच.
समोरच्या बाईकवर निसटती जीन्स घातलेली मुलगी
घट्ट चिकटलीय पुढच्याला.
तिचा तंग-आखूड टॉप
गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम मोडून काढतोय ऐन चौकात.
मी वेधला गेलोय
तिच्या उभ्या ठळक रेषेमध्ये खोल.

आता सिग्नल सुटलाय. मीही सुटलोय.
उभ्या रेषेच्या खोलीत डोकावत त्याच वेगात.
पुढच्या सिग्नालाही मी मागेच थांबलोय तिच्या.
आजुबाजुचेही बहुतेक जण तिथेच खिळलेले आहेत आपापल्यापरीने माझ्यासारखेच.
रस्ते वेगळे होताहेत यथावकाश सिग्नल सुटताना.

मीही अगदी सहज, हलक्या डोक्याने घराकडे वळलोय.
घरात शिरताना प्रेमळ स्वरात बायको म्हणतेय;
“झाला वाटतं पारा शांत”
मीही हसून अनुमोदन देतोय तिला.

रात्री आडवा होताच उभी खोल रेघ मानात येतेय तिची.
अन रात्रीचा पारा चढत चाललाय खोलवर.
बायकोवरचा राग, आत्महत्येची तिडीक
कुठल्या कुठे हरवून गेलीय
या शांततेत.

Friday, November 04, 2011

परवा मेली बरका कविता

परवा मेली बरका कविता
थकली होती; खचलीही होती
डोळ्यांत उघडं आकाश ठेऊन
मुठीत थोडी माती घेऊन
शांत सहज गेली कविता।




जुनंच खोड ते भलतं काटक
-रानावनात घडलेलं, डोंगरद-यांत घुमलेलं,
उन्हातान्हात काट्याकुट्यात
अनवाणी फिरलेलं.




हसतमुख होतं तसं गूढही होतंच
उगा गेली नाही कुणाच्या वाट्याला
पण तिच्या वाटेत जे जे आले
ते सरले बुवा आपसूक मागे




तिच्या झोळीत गोटा होता की काय
ते कळलं नाही.
- आणि आताशा तर ती झोळीही दिसत नाही. असो.



पण म्हातारी सुटली एकदाची.
ते बरंच झालं.
तसे म्हणायला सगळे सोयरेच इथे
तिचं नाव घेतल्याशिवाय
कुणाचा दिवस गेला नाही खरा
पण ...
दिवसेंदिवस हाडं वर येत चालल्याचं कळत होतं.
उपाशी पोट तगणार तरी किती ?




गावातला येडा तुक्या तरी
तिला द्यायचा भाकर रोज.
-स्वतः अर्धपोटी राहून.
काय जमलं होतं त्यांचं
ठाऊक नाही;
पण तो आला की ती
उघडून ठेवायची सगळी झोळी त्याच्या पुढ्यात
अन् तो नाचायचा खुशाल एकतरी लावून.



लोक गमतीनं पाहायचे
सोयीनं ऐकायचे
धोरणानं बोलायचे त्यांच्याबद्दल.
पण भाकरी दिली नाही काढी कुणी
ना त्याला ना तिला.



एक दिवस तुका
चालता बोलता देवाघरी गेला.
त्या दिवशी पहिल्यांदाच
त्या म्हातारीच्या त्या कवितेच्या
डोळ्यांत पाणी होतं.
पण टाहो नव्हता. खंत नव्हती. शब्दही नव्हते.
होती ती शांतता आणि गुढता.



तुका गेला म्हणून म्हातारी इतक्या लवकर जाईल
असं वाटलं नव्हतं.
बाकी आता गावगाडा चालू आहे
आहे तसाच.
जरा कलकलाट वाढलाय आणि
देवाच्या गाभाऱ्याला नवीन चकचकीत कुलूप आणून लावलाय
इतकंच...!

Thursday, July 28, 2011

कोट्या नु कोटी

नव्यानेच केल्यात वाटा म्हणाले
जुन्याला आता द्या फाटा म्हणाले

घड्याळात नाहीत काटे तरीही
वेळेस काढू काटा म्हणाले

कुणाचे कुणाशी पटेना तरीही
बळानेच वाटू पाटा म्हणाले

न मलई न लोणी आहे फक्त पाणी
तरी फार झालाय घाटा म्हणाले

नको चळवळी अन् नको ते उठाव
ब-या वाटती याच लाटा म्हणाले

ही कुलुपे नि किल्ल्या ती भिंती नि दारे
चौकी तरी पास थाटा म्हणाले

असे शब्द भारी तरीही सुचेना
करप्टेड आहे डाटा म्हणाले

कुठे चालले एवढ्या दूर लोक?
घरातील संपलाय आटा म्हणाले

अन्याय माझे कोट्या नु कोटी
आता पाय याचेच चाटा म्हणाले

Monday, July 04, 2011

पुन्हा केव्हातरी !

काळजाच्या ठोक्यावर चालणारे

घड्याळ म्हणते;

“मलाही काही मर्यादा आहेत.”


स्पेशल इफेक्ट देऊन

झपझप उलटणारी कॅलेंडरची पाने म्हणतात;

“काळजी नको, आम्ही आहोतच.

तुम्ही असला नसलात तरी”


माझी शून्यात गेलेली

आरशातली नजर म्हणते;

“जाऊ देत ... पुन्हा केव्हातरी !

पुन्हा जन्म मिळतोच म्हणे”

Monday, March 28, 2011

साहेब

काही लोक मनगटातली

ताकत वापरत म्हणाले;

"आजपासून आंम्हाला साहेब म्हणायचं !"

मग लोकही फारसा विचार न करता

त्यांना ‘साहेब’ म्हणू लागले...

सर्व साहेबलोक मातृभूमीला ‘रियल इस्टेट’ मानत।

एके दिवशी सर्व साहेबांनी

मिळून मिसळून एजंट पेरून

स्वर्गाचं डील केलं आणि

मग हा स्वर्ग

साहेबलोकांनी आपल्या मर्जीतल्या

(किंवा सोयीच्या)

लोकांसाठी आरक्षित केला.

उरला नर्क

तर नर्काच्या बॅकग्राऊंडला साहेबलोकांनी

विकासाचं-प्रगतीचं सुंदर चित्र रेखाटून ठेवलं.

आणि नर्कवासी होऊ घातलेल्या जनतेला सांगीतलं;

" आंम्ही तुमच्यासाठी खास हा

विकासाचा आराखडा आखून ठेवलाय.

यात रंग भरत रहा.

आपण विकासाच्या खुप जवळ येऊन पोहचलो आहोत। "

मग जनता भारावली आणि

बदलत्या काळाशी जुळवून घेत

चित्रामध्ये रंग भरू लागली...

साहेबांचा जयघोष करू लागली.

साहेबही कृतार्थ नजरेने जनतेकडे पहात राहीले.

तरीसुद्धा त्या सुंदर चित्रामागे

काही लोक विव्हळताना ऐकू येत होते.

ते म्हणे या साहेबलोकांना

निष्कारण विरोध करत होते...

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...