Friday, December 31, 2010

पुन्हा निरक्षर...

पुन्हा निरक्षर होता आलं असतं
तर बरं झालं असतं...

मुळाक्षरांच्या बुबुळात बुबुळे घालून
संवेदना हरवून गेल्यात जगण्याच्या...
डोळ्यांना दिसते आहे म्हणून फ़क्त...?
मेंदूचं काम थंडच... कित्येक दिवस.

वृत्तपत्रे अन माध्यमांच्या
आवाजाला म्हणतो आहे
माझा आवाज...माझं ज्ञान

या मुळाक्षरांनी दाखवली खरी
डोंगरापलीकडची घळ.
पण ओळी ओळीतून
मला बसवलच
काचेच्या घरात...


वाचून वाचून डोळे आगावले
नि लिहून लिहून बोटे निर्जिव...
पण ना टाळी लागली कुठे...
ना दंगलीत फेकला गेलो आपोआप...
घृणेची थूंकी टाकत राहिलो
आपली कमी पडू नये म्हणून.


आता बाहेर पडलो तरी
असेलंच सोबत

या अक्षरांची सावली त्यांचे डाग...
व्यक्त होण्याच्या निलाजस सवयी


खरच पुन्हा निरक्षर होता आलं असतं तर...?

Friday, December 17, 2010

तिला वाटले...
ही कविता संगितबद्ध केली असून त्याची यू ट्यूब वरील लिंक जोडतो आहे.


तिला वाटले तिच बरोबर...
मला वाटले चुकलो मीच...
......................
......................

एक कुणीशी होती माझी
माझ्याहूनही माझी माझी
नव्हते काही वेगवेगळे
वाट एक ती तिची नी माझी

शपथा होत्या उधाणलेल्या
स्वप्ने होती अंकुरलेली
मन्मनातील फुले बावरी
अलगद होती सावरलेली

सरल्या वाटा अवखळ-अनघट
सरली वळणे अवघडशी
काळ जरासा पोक्त जाहला
नवलाई अन अवजडशी

तशी अचानक उल्केपरी त्या
म्हंटली होती मजला ती
"प्रेम नि माया झूठच सारे
फसवी सारी ही नाती"

"पाण्यासम त्या व्हावे जगणे
वा-यासम त्या गावे गाणे "
आणि म्हणाली, "किती बंध हे
रोज तेच ते येणे-जाणे"

क्षणभर थरथर पडते अंतर
दूर उभा मी बघताना...
प्रेमामधले शब्द तिचे ते
जखमेपरी त्या जपताना...

हाय! "सखे तू असो सलामत"
दुवा देत ही जगतो आहे...
तसाच वारा तसेच पाणी
रोज नव्याने बघतो आहे...

तिला वाटले तिच बरोबर...
मला वाटले चूकलो मीच
उमगून येता गत फसवी ही
माझ्यावरती हसलो मीच...
kamalesh kulakarni

Tuesday, December 07, 2010

प्रपोज

प्रपोज १
"तु मला मित्र म्हणून आवडतोस पण...
मी तुझा त्या दृष्टीनं
कधीच विचार केला नाहीये.
प्लिज राग मानू नकोस "

प्रपोज २
"तुला वाटतं तितकं सोपं नाहीये माझं.
अजून तू माझ्या ताईला आणि बाबांना
ओळखत नाहीस."

प्रपोज ३
"तु चांगला आहेस रे ... पण
माझ्या बाबांनी खूप कष्टात दिवस काढलेत
आता त्यांना आम्हाला सुखी पहायचय...
मी त्यांच्या अगेंस्ट नाही जाऊ शकत."

प्रपोज ४
"थांब. आत्ता नको.
घरात माझ्या लग्नाचा विचार चालू झाला की
मी दुसरं कुठलाही स्थळ बघण्यापूर्वी
तुझंच नाव सुचविन. इतकं नक्की."

प्रपोज ५
"व्वा... आहे का आठवण?
म्हणे लग्न करायचय.
माझी किंमतच नाही तुला.
सारखं काय काम काम काम?
इतका पैसा पैसा केलेलं
मला नाही आवडणार बुवा.

प्रपोज ६
ए एक विचारू ?
- मी का आवडते रे तुला?
- माझ्यासारखीच यापूर्वी कुणी? "

प्रपोज ७
"खोटं खोटं खोटं
सगळ्यांसारखेच आहेत
माझे डोळे माझे केस माझे ओठ
एक सांगू? तू नवरा म्हणून
छान वाटतोस मला."

प्रपोज ८
"ए इतके नॉन-व्हेज मेसेजेस
नको पाठवूस न...
चूकुन बाबांच्या हातात
मोबाईल पडला तर...?"

प्रपोज ९
मला खूप भीती वाटततेय रे ...
नुसत्या एका किसवर थांबणारे का?
पण भेटायचं कुठे?
आणि हो एकच किस हं? प्रॉमिस?

प्रपोज १०
"नको... थांब... प्लिज...बास...
खुप पुढे जाऊ नकोस
भीती वाटतेय...
आई-बाबांना फ़सवतेय असं वाटतय.
ऊं. थॅंक्स. छान वाटतय..."

प्रपोज ११
"आता जरा जपूनच रहावं लागेल.
बाबांना शंका होतीच.
तुझ्याशी काँटॅक्ट तोडायला सांगितलाय.
तुझ्याविषयी सगळी चौकशी केली त्यांनी.
खुप अवघड झाल्यात गोष्टी...
- तु सेटल हो लवकर...
घर, गाडी. म्हंजे मला नीट बोलता येईल."

प्रपोज १२
"आज घरी एकटीच आहे.
लग्नाला गेलेत सगळे.
येना लवकर."

प्रपोज १३
"बाबांनी एक स्थळ आणलय.
मुलगा युएस चा आहे."

प्रपोज १४
"मी तुला गुंतवलं?
मी पहील्यापासूनच क्लियर होते
बाबा आणि ताईच्या अगेंस्ट जाणार नाही म्हणून.
माझ्या जागी दुसरी कुणी असती तर ...
विचार तरी केला असता का तुझा?"

प्रपोज १५
"खुप छान वाटतं रे तुझ्या कुशीत
असं वाटतं अशीच रहावी ही मिठी.
पण आपण हे थांबवायला हवं...
उद्या माझ्या होणा-या नव-याला
मी कसं सामोरं जाऊ?
सांगते ते ऐक न प्लिज
तू पण लग्न कर...
मिळेल तुला माझ्याहून छान बायको
मी शोधू का?"

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...