Saturday, October 30, 2010

अपूर्ण

खरं तर मला
काहीच म्हणायचं नव्हतं कधीच...
पण म्हणून बसलो.
जसं की तिला
प्रपोज करून बसलो...


मग देत राहिलो उगाचंच
समर्थने स्व-कृत्याची.
जसं की देत राहिलो
ती का आवडते वगैरेची...


मला जे म्हणायचय
ते कितीतरी लोक

म्हणून बसलेत आँलरेडी.
खर तर मी त्यांचेच शब्द चोरून बोलतोय
स्वतःचे असल्याच्या थाटात.
ऎकणारे ऎकतात...
जसं की ती ऎकते...


मग मी खरा की खोटा?
शोध शोध शोधूनही
सापडत नाही मलाच.
उत्तर अपूर्णच याही प्रश्नाचं
जसे की तिचे डोळे...
दाद लागू न देणारे...
अपूर्ण...
आणि म्हणूनच मला ते
माझे अगदी माझे वाटणारे...

-कमलेश कुलकर्णी

Saturday, October 23, 2010

मुंगळे

सगळेच हात हालवत निघलो शहराकडं
बापाचं गठूडं असल्यागत


पटापट चिकटलो गुळाला
मुंगळ्यांचा धर्म पाळीत
ढेपा बदलत राहील्या
पण आम्ही मुंगळेच
रांगेतल्य़ा शिस्तीतले


कुणास ठाऊक ही ढेप
गावच्या मातीतल्या ऊसाची
तर नसेल?


आणि ते खरोखरीचे मुंगळे
ते तर आपल्या बिळांत
आन्नाचा खुप साठा
करून ठेवतात म्हणे
च्यायला आपल्याला

तेही जमलं नाही।

आता गावात परतायचं म्हंटलं तरी
हात हालवतचं जावं लागेल.
गठूडं संपल्यागत


त्यापेक्षा इथेच राहू
मुंगळे बनून
रांगेतल्या शिस्तीतले.

Friday, October 15, 2010

लँमिनेट

"आपण ब्राम्हण आपण ब्राम्हण"
असं समजावत
सगळी कातडी
लँमिनेट
करून टाकली
मोठं होईपर्यंत घरातून

बाहेरच्या बाहेर धुता येतील
इतकेच शिंतोडे
उडायला हवेत स्वत:वर
दटावून सांगत राहीले संस्कार

"आपण कसे श्रेष्ठ
आपण कसे उच्च "
अशी वाक्ये
दबक्या आवाजातच
पोहोचली कानात
अन आंबेडकर - फ़ुल्यांवरची भाषणं
ताठ मानेनं चढ्या आवाजात
सांगत
छाती फ़ुगवून घेतली
शाळाभर ...

शेजारच्या मुलाच्या
अंगाचा वासही
वाटायचा जातीय
पण त्याचा पीळदार स्नायू
कुठल्या जातीत राहून तयार झालाय
हे सांगितलं नाही कुणीच

ताटात हात धुतल्यावर
कानशिलात खायचो वडलांची
म्हणायचे, " याद राख पुन्हा
असा अन्नाचा अपमान करशिल तर..."
पण
"चिकन मटण खाणा~या
मुलांच्या बैठकीत बसायचं नाही
खायला शाळेत "
बजावून पाठवायचे
जणू की ते अन्नच नाही।

आता कुणाच्याही
खांद्याला खांदा लावून
काम करतो झकत

पण कातडीवरच्या
या लँमिनेशनपाई
कष्टाच्या घामाचा
अन शरीराचा
खराखुरा वासही
येईनासा झालाय.

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...