Monday, March 28, 2011

साहेब

काही लोक मनगटातली

ताकत वापरत म्हणाले;

"आजपासून आंम्हाला साहेब म्हणायचं !"

मग लोकही फारसा विचार न करता

त्यांना ‘साहेब’ म्हणू लागले...

सर्व साहेबलोक मातृभूमीला ‘रियल इस्टेट’ मानत।

एके दिवशी सर्व साहेबांनी

मिळून मिसळून एजंट पेरून

स्वर्गाचं डील केलं आणि

मग हा स्वर्ग

साहेबलोकांनी आपल्या मर्जीतल्या

(किंवा सोयीच्या)

लोकांसाठी आरक्षित केला.

उरला नर्क

तर नर्काच्या बॅकग्राऊंडला साहेबलोकांनी

विकासाचं-प्रगतीचं सुंदर चित्र रेखाटून ठेवलं.

आणि नर्कवासी होऊ घातलेल्या जनतेला सांगीतलं;

" आंम्ही तुमच्यासाठी खास हा

विकासाचा आराखडा आखून ठेवलाय.

यात रंग भरत रहा.

आपण विकासाच्या खुप जवळ येऊन पोहचलो आहोत। "

मग जनता भारावली आणि

बदलत्या काळाशी जुळवून घेत

चित्रामध्ये रंग भरू लागली...

साहेबांचा जयघोष करू लागली.

साहेबही कृतार्थ नजरेने जनतेकडे पहात राहीले.

तरीसुद्धा त्या सुंदर चित्रामागे

काही लोक विव्हळताना ऐकू येत होते.

ते म्हणे या साहेबलोकांना

निष्कारण विरोध करत होते...

Monday, March 21, 2011

दोघे

तिला उमगत नाही की
त्याच्या आत काय स्पिरीट आहे म्हणून
त्याला किंमत नाही की
बायको त्याच्याच संसारासाठी किती झिजते आहे म्हणून


ती सोसते सोसते अन भडभडते सगळी आग
"बाबा रे संसार असा होत नसतो..."
तो ऐकतो ऐकतो अन हळूच सांगतो
आयुष्याचं गिमीक तिच्या कानात


ती जमवत राहते काडी काडी
सुखाच्या दिसाच्या स्वप्नासाठी
तो क्षणाक्षणांत भरत राहतो रंग
जणू की हेच स्वप्नं असल्यागत


ती ऐकवते-विचारते जाब आपल्या भविष्याचा
तो सांगतो त्याच्या ईच्छा, मजबूरी नि घुसमट


तिला व्यर्थ वाटतात तिचे सगळे प्रयत्न
त्याला खूपत राहतात नात्यातले अपरिहार्य बंध


तिला वाटतं उगाच याच्याशी लग्नं केलं
त्याला वाटतं उगाच आपण संसार केला


आताशा ओळखलेल्या असतात दोघांनीही
एकमेकांच्या दुख-या नसा
आताशा फुटलेल्या असतात
एकाच दारातून दोन वाटा


घराच्या बाहेर तिलाही जाणवतं
तो किती वेगळा आहे म्हणून
त्यालाही फिल होतं की
तीचा किती आधार आहे म्हणून


दोघेही रोज कर्तव्यागत
एकमेकांवर दात-ओठ खात राहतात
दिवसाअंती त्यांचे ओठ
गालांवरचं खारट पाणी टिपत
ओठांमधेच विरून जातात...

Tuesday, March 08, 2011

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडूलकर... दिवसेंदिवस वाढत जाणारं कुतूहल-आदर। त्याला शब्दांत गुंफण्याचा हा प्रयत्न.

डोळ्यांत तुझ्या तो सूर्य उद्याचा जागा
की वचन दिले तू? ‘काय हवे ते मागा !’
ओलांडून अंतर दूर उभा तू तरीही
काळजात आपुल्या हा कुठला जडला धागा...?


तुज ठाऊक ना रे का तुज टाळी मिळते?
तुज माहीत ना रे सुख कुठेशी मिळते?
तू अबोल तरीही बोलतोस ना काही ?
कळणा-याला शब्दांवाचून कळते


तू थांब पहा ती नियती आली चालून
एकेक श्वास छातीत जरा घे ढवळून
तू तोल पुन्हा, कर असा नेमका वार
नियतीच्या हाती देत रहा तू हार


तू दिला मंत्र परी तुला नसावा ठावे
मैदान सोडूनी ना कधी पळूनी जावे
हे दूःख, वेदना, दाह आणि ही सल
ध्येयाच्या पुढती सारेच जणू चंचल


ही अस्सल कीर्ति अखंड तेवत राहो
हा झरा चांदणे आकाशीचे वाहो
तो देव तुला तव निष्ठा आंदण मागो
आयुष्य तुला तव शतकांइतके लाभो

कमलेश कुलकर्णी

Tuesday, March 01, 2011

अबब !


: सर आमच्या सरांची ईच्छा आहे की तुम्ही आमच्या वर्तमानपत्रासाठी लिहावंत.
: अरे पण मी तर गायक आहे. मला विशेष लिहिता येत नाही.
: अहो सर तसं विशेष काही नकोय. तुम्ही फक्त थोडे अनुभव सांगा. शब्दांकनाचं आम्ही बघू. तुमचं नाव असलं म्हणजे...! मानधन पण चांगलं मिळवून देऊ.
: मग ठिके। आपण एकदमच दोन महिन्याचे लेख तयार करून ठेऊ.


अब

: मॅडम... ? तुमचा छान फोटो लावू. मानधन.
: हो लिहीन की. इट्स माय प्लेझर.
: येस मॅडम। आधी अभिनय, मग ‘त्या’ प्रोग्रॅमसाठी सिंगिंग आणि आता लेखन. अ व्हेरी व्हर्सेटाईल पर्सनॅलिटी...! थॅंक्स.

अबब !

: सर मी चांगलं लिहू शकतो. कुठलाही इव्हेंट, घडामोडी, पॉलिटिक्स, लीटरेचर, कविता, चारोळ्या, जिंगल्स, स्क्रिप्ट्स, डायलॉग्स, एनिथिंग... एकदा संधी देऊन बघा न सर. प्लिज. अत्ता जे छापलं जातय त्यापेक्षा नक्कीच काहीतरी चांगलं आणि सकस लिहीन मी सर...
: ते ठिक आहे. चांगलं लिहितोस तर मग एखादा स्टेज शो बसव. कर्यक्रमांसाठी निवेदनं कर. पब्लिसिटी मिळव. आता खुप सिरीयसली लिखाणाचे-वाचनाचे दिवस नाहीयेत. काळाबरोबर चाल.
: पण सर... मी लिहितो... ते प्रोग्रॅम्स? सर प्लिज सर फक्त एकदाच...?
: अरे तुमच्यासारखे किती लोक असेच चांगले लिहितात. पण आंम्हाला काय फायदा? तू म्हणतोस तर मी एक गोष्ट करू शकतो. तुझं जे लिखाण आहे ते सबमीट कर. स्पेस मिळाली की टाकू. पण मानधन काही मिळणार नाही. शिवाय आमच्यासाठी काही सेलिब्रेटीजच्या लेखांचं शब्दांकन करावं लागेल. डन?
: ... ठिके सर. थॅंक्यू व्हेरी मच सर.

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...