Friday, December 14, 2012

ब्रँडेड पँ‌‍‌ट‌‍‌‍‍‍‌चाही निघून जातो रंग पहिल्या धुण्यात तेव्हा



ब्रँडेड पँ‌‍‌ट‌‍‌‍‍‍‌चाही निघून जातो रंग पहिल्या धुण्यात तेव्हा
कर्तव्यदक्ष ग्राहकाची भूमिका संचारते माझ्या तना-मनात

आणि मी सरसावतो पँटसहीत मॉलमध्ये
तिथली रिसेप्शनिस्ट घेऊन जाते मला कम्प्लेंट डिपार्टमेंटकडे अदबीने
“इसमें आपकीही कुछ गलती होगी”
हे ऐकून निघून जाते हवा माझ्यातल्या उत्साही रागाची

मी प्रयत्न करीत राहतो मॅनेजरपर्यंत पोहचण्याचा
आणि मुर्ख ठरत जातो ‘सिस्टेमॅटिक’ नजरेत
इथला एचआर समजावतो एका कोपऱ्यात
”आपने पहले ड्रायक्लीन करना चाहिये था
आज कल सभी लोग करत है.
एक दो प्रॉडक्ट फॉल्टी रहतेही है”

मी मान्य करून टाकतो माझा नैतिक पराभव
आणि इतक्या घुसमटीतही
सक्तीचं हेल्मेट चढवून परततो घरी 

ब्रँडेड पँटचा गेलेला रंग माझ्या ब्रँडेड बनियनवर
येऊन बसलेला असतो पर्मनंट
माझ्या ब्रँडेड बनियनची जमा झालेली बेंबीतली सुतं काढीत
मी पूर्ण करतो माझ्या आयुष्यातला एक दिवस 

सकाळी बायको आजच्या पेपरावर बसलेला
कालच्या बनीयनचा बेंबीतला सुताचा बोळा उडवत
वाचून दाखवते मोठमोठ्याने
आजच्या पेपरातला ‘पॉझिटीव्ह थिंकिंग’चा लेख
आपलंच काहीतरी चुकतंय अशा रोखात 

रंग उडालेली ब्रँडेड पँट घरात वापरायला काढून
मी समारोप करतो या विषयाचा
आणि जुन्या पँटचे उसवलेले खिसे
टीप मारायला टाकतो

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...