Friday, February 04, 2011

महात्मा जन्मा न येवो


पुढा-यांना कळो कविता
एक एक ओळ अनुभवताना
त्यांचाही होऊन जावो
एकनाथ नामदेव निवृत्ती तुकाराम
मग खुशाल त्यांचेच येवो राज्य
गल्ली ते दिल्ली


पोलिसांची काठी पडो ड्रम्स कीटवर
दबक्या पिचक्या रडक्या भेदरल्या भादरल्या
लोकांच्या कंठातून
जन्मा येवो संगित


मजूर वडारी गडी लोकांचे
बायसेप्स नि ट्रायसेप्सला मिळो
शरीर श्रौष्ठवाची ढाल
रस्ते इमारती पूल भिंतींवर
लावोत कोनशिला
राबत्या हातांच्या
त्यांच्या तळहाताच्या घट्ट्यांवर
रूळत राहो पुष्पगुच्छ


माणसाला माणूस कळो
विचारांची दहशत वाटो
कष्टाचा देव होवो
घामाचे तीर्थ
टीव्हीत शांतता येवो
जगण्यात तल्लीनता


माणूस म्हणून जन्मा येवो माणूस म्हणून मरो
या लोकी चुकूनही महात्मा जन्मा न येवो

Wednesday, February 02, 2011

अर्धी कविता

अर्धी कविता घेऊन
आलो घाई घाई
म्हंटले; "असू दे उद्यास
थोडी शिल्लक शाई"

अर्धी कविता भींतीवर
चिकटवली काल
अर्ध्या कवितेवर
चूकचूकली अवघी पाल

आता न ठावे कुठे
मिळावी कविता उरली
बघता बघता
पेनामधली शाईपण विरली

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...