Friday, January 28, 2011

रस्ते


रस्ते बांधले
झाडं कापून
इवल्या पक्षांचं अंगण टाकून
अन् आकाशाला गवसणी घालायला निघालो आपण

किती लोक रस्ता धरतात
सकाळ होता होता
कितीही कोंडी झाली तरी
माणूस कोंडीत सापडत नाही रस्त्यावर
घरच्यासारखा
नि रस्ता मागे खेचत नाही
घरच्यासारखा
हा हा म्हणता
केवढी प्रगती झाली राव
तरी लोक रस्त्यावरच उतरू पाहताहेत
मैदानं सोडून

मिरवणूका वराती यात्रा अंतयात्रा
मोर्चा दंगली फटाके अश्रूधूर
शतपावली मॅरेथॉन धावपळ
खाणं पिणं थुंकणं
गप्पा टाळ्या कट्टा शिट्ट्या
पेपर बातम्या अफवा
शाळा दुकानं
सगळा संसार थाटला रस्त्यावर
काही संसार रस्त्यावर आले
ते निराळेच

तरी रस्तेच चुकत राहिले नेहमी
माणसांऐवजी
माणसं चुकलीच नाहीत राजे
वर चुकणा-याला रस्ताच दाखवला गेला शेवटी

इतक्या रस्त्यातही रस्तेच
सापडले नाहीत न काहींना
रस्त्यांने देऊ केलाच त्यांनाही एक कोपरा
आणि ज्यांना मिळाले रस्ते ते
रस्त्यावर येईनासे झाले

अजून कितीतरी नवे रस्ते
बांधायचे आहेत म्हणे यंदा

Wednesday, January 19, 2011

झाड

एक
आक्राळ विक्राळ
उंच सताड
भले भक्कम
झाड
होतं
झाड पाहून
इंटूकले चिंटूकले पिंटूकले
सब लोग
हबकले
त्तिथेच थबकले

एक जण म्हंटला;
“आम्ही सगळे उंच
झाड पण उंच
मग हे झाड आमचं”

आणखी एक म्हणे;
“झाड असतं निसर्गाचं
आम्हीपण निसर्गाचे म्हणून
हे झाडही आमचेच”

एक जण गरजला;
“याच्याच सावलीत जन्माला आलोय
तुमचा काय संबंध ???
तुम्ही जिथले तिथेच मरा...”

आणिक एक उठला;
“हे झाड हिर्व
माझी त्वचा हिर्वी
झाड माझंच”

त्यातही
एक जण सावधपणे
पडती फळे वेचत राहिला
एक जण कंटाळून
रंगीत फुले हूंगत बसला

पुढेशेंड्यापासून बुडख्यापर्यंत
डोक्यापासून चपलेपर्यंत
सगळेजण जमेल तसे
लढ लढ लढू लागले
थकले तेव्हा सगळ्यांनी
अंग झटकून
वेगळं केलं

तोवर झाड
विद्रुप झालं
काही फांद्या तुटल्या
तर काही सुकल्या
पाने गळून पाचोळली
निकाल काहीच लागला नाही
वाद कधी शमला नाही

पुढे
टूकार वादळ वा-यात
तेच झाड त्याच माणसांवर
उन्मळलं
झाडाखाली
सब लोग
एक गठ्ठा मातीमोल

दिवस सरले
पडल्या खोडाला
पडल्या पडल्याच पालवी फुटली
नवी पालवी नव्या लोकांनी
हूशारीने हेरून ठेवली

या आधीही
असंच झालं असावं
बहूदा
कारण पुढेही ते तसंच चालू राहिलं

Thursday, January 13, 2011

तो ६० इंचाचा माणूस


तो ६० इंचाचा
मा
णू

त्याने १०००
स्के अ र फ़ु ट
घ र
घे त लं

सोबत म्हणून
१ एकरचं
फ़ार्महाऊस


१२०
इं
चा
ची
कार
घेतली

तो पेग लार्ज घ्यायचा
त्याच्या हॅबीट्सही स्ट्रॉंग.
त्याचा टीव्ही ३२ इंची
फ्रिज ३०० लिटर्स
त्यानं त्याच्या लग्नात
बायकोच्या १० इंची

ळ्या

२८ इंची
मं


सू
त्र
घातलं
त्याची बायको मग त्याच्या घरी
आपलं घर म्हणून राहू लागली

तो बुटका वाटायचा पण
कपडे-परफ़्यूम ऊंची वापरायचा
त्यानं पडलेले दात सोन्यानं घडवले
त्याचं ऑफ़िस अर्ध्या तासावर
पण तो वर्ल्डटूर करून आला
त्याचं वाचन कमी
पण पुस्तकं जाडजूड घ्यायचा
पार्टी दिली तर जंगीच द्यायचा
एकदा तो त्याच्या
४ बाय ५ च्या
बा
थ रू

मधे
पा



रू

पडला आणि मेला


त्याची बायको माणसं पाहून
धाय मोकलून
रडली...
त्याची मुलं
आईलाआधारदेतम्हणाली
"जे व्हायचं होतं ते झालं"

त्याचे
ना
तू
मोठे
झा
ले
तेव्हा त्यांना आपल्य़ा
आजोबांनी
जन्मभर काय केलं?
असले प्रश्न पडले नाहीत.
त्याच्या नातवांनी
त्या ६० इंचाच्या
मा

सा
ची
त्याच्याच घरातली
१२ बाय ८ इंचाची तसबीर...
ह जा रो कि लो मी ट र्स लां बी च्या
पाणी
अटलेल्या
नदीत
सो डू न दि ली.

Wednesday, January 12, 2011

काळ

तोच सुर्य तोच चंद्र
तरी काळ बदलल्याच
जो तो म्हणत होता


मनं अधिक निरगट्ट आणि यंत्रे भलतीच
सेंसिटिव्ह झाली

स्वातंत्र्यसैनिक म्हणाले;
"स्वातंत्र्यानंतर खुपच मरगळ आली आयुष्याला"

टिव्हीमुळे फावला वेळच मिळत नसल्याचं
गृहिणी म्हणाल्या.

बहूसंख्यने लोक हळूहळू एकटे पडले

मसल पॉवर वाढलेल्या माणसांच्या भावना
वरचे वर दुखू लागल्या

स्थानिकांचा कल पाहून मल्टीनॅशनल कंपन्यांनी
गोमुत्रापासून दारूनिर्मिती केली

बघता बघता सगळे इतके मॅच्यूअर्ड झाले की
आध्यात्मावर कॉमेडी करू लागले

बाजारपेठा इतक्या विस्तारल्या की
औषधांपासून उपदेशांपर्यंतचे सगळे डोस
गरजांनुसार उपलब्ध झाले

खुल्या अर्थ व्यवस्थेत पैशाला
कुठं थांबावं कळेना झालं

विकासाच्या मुद्द्यावर राजकारणी मोडतोड करू लागले
आणि क्रांतिची वाट पहात समाज
कंटाळून झोपी गेला

सरते शेवटी जाणिवा बोथट झाल्याचं
सगळ्यांनाच ठळकपणे जाणवत राहिलं

Friday, January 07, 2011

डोळे

एकीचे डोळे: उगाचच हसरे.
मोहक पण स्वतःचे नसलेले
एकीचे डोळे: अगदी अबोल.
कुणी कुणाचे नसल्यागत
एकीचे डोळे: एकामागुन एक एकामागुन एक
प्रश्न घेऊन बसलेले
एकीचे डोळे: तजेल बिनधस्त आरपार
"घे टिपून" म्हणणारे

एकीचे डोळे: आखिव रेखिव सजग
शरीरासकट हलणारे
काहीतरी जाणवूनही
जाणवू न देणारे

एकीचे डोळे: हताश
आयुष्य हरवल्यासारखे

एकीचे डोळे: चुकार
बघायला लावूनही
पश्चातःप करून देणारे

एकीचे डोळे: आपल्यासारखेच
आपल्या भाषेत बोलणारे
म्हणून... रोज रोज अर्थांची वर्तुळे
रुं दा व त नेणारे
एकीचे डोळे: तिरळे.
आपलं काय
चूकतयच्या
भव-यात पडलेले
एकीचे डोळे: काळोखाचे.
उजाडणं-मावळणंच्या खेळापासून दूर
रस्त्याच्या या टोकापासून...
त्या टोकापर्यंतच्या प्रवासात
नसलेल्या दृष्टीत
प्राण टाकू पाहणारे
मा झे डो ळे: प्रत्येक डोळे आवर्जून पहात
दृष्टीआड करणारे

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...