Monday, June 04, 2012

गर्दीत हरवलेला मी


गर्दीत हरवलेला मी शोधत राहतो
त्याच गर्दीत सापडशील का तू कुठे?

माझ्या तमाम रातआंधळ्या स्वप्नात
अजूनही वावरते आहेस तू बेधडक
कितीही गुंगीत ठेवलं स्वतःला तरी.

तुझा स्कार्फ, गॉगल, हँडग्लोव्हज
बंदोबस्तासाठी सज्ज असतीलच नखशिखांत.

आणि तरीही
तुझ्या केसांचा, काजळाचा नि तुझ्या आवडीच्या अत्तराचा
एकत्रित वास घेऊन येईल तुला माझ्यापर्यंत.

बस एवढीच एक शेवटची ओळख शिल्लक आहे माझ्याकडे
बाकी तुझाही चेहरा हरवत चाललाय स्मरणातून
माझ्यासारखाच गर्दीत. 

Saturday, June 02, 2012

आपण


एक बेरकी सल सलत राहतो जन्मभर
सेप्टिकही होत असेल कुणास ठाऊक.
चाहूल नसते जराही - वाऱ्याच्या इतिहासाची-भविष्याची
आपलंच नशीब फुटकं म्हणत हताश झालो तरी.
तिच्या डोळ्यांतल्या प्रवासात भटकताना हरवलो आरपार तरी
‘ध्यान लागल्या’चं म्हणत नाही कुणीच.
या अचाट ब्रम्हांडात अनंत सूर्यमालेत
रोज चड्डी घालावी लागतेय- लाजेपायी.
चिमण्या गेल्या उडून हाकेबाहेर
अँग्री बर्डचे नेक्स्ट व्हर्जन अपलोड करताना.
इकडचे रक्त तिकडे तिकडची किडनी इकडे कात्र्या सुरे सलाईन -
एक दिवस सुखाने मरण्यासाठी.
आपल्याच स्वप्नाला लावून ठेवावं गालबोट
इतके प्रामाणिक आपण.
तोडलेल्या फांदीला पुन्हा पालवी फुटणार या निकषाने
कलम झालेलो आपण.

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...