Friday, December 14, 2012

ब्रँडेड पँ‌‍‌ट‌‍‌‍‍‍‌चाही निघून जातो रंग पहिल्या धुण्यात तेव्हा



ब्रँडेड पँ‌‍‌ट‌‍‌‍‍‍‌चाही निघून जातो रंग पहिल्या धुण्यात तेव्हा
कर्तव्यदक्ष ग्राहकाची भूमिका संचारते माझ्या तना-मनात

आणि मी सरसावतो पँटसहीत मॉलमध्ये
तिथली रिसेप्शनिस्ट घेऊन जाते मला कम्प्लेंट डिपार्टमेंटकडे अदबीने
“इसमें आपकीही कुछ गलती होगी”
हे ऐकून निघून जाते हवा माझ्यातल्या उत्साही रागाची

मी प्रयत्न करीत राहतो मॅनेजरपर्यंत पोहचण्याचा
आणि मुर्ख ठरत जातो ‘सिस्टेमॅटिक’ नजरेत
इथला एचआर समजावतो एका कोपऱ्यात
”आपने पहले ड्रायक्लीन करना चाहिये था
आज कल सभी लोग करत है.
एक दो प्रॉडक्ट फॉल्टी रहतेही है”

मी मान्य करून टाकतो माझा नैतिक पराभव
आणि इतक्या घुसमटीतही
सक्तीचं हेल्मेट चढवून परततो घरी 

ब्रँडेड पँटचा गेलेला रंग माझ्या ब्रँडेड बनियनवर
येऊन बसलेला असतो पर्मनंट
माझ्या ब्रँडेड बनियनची जमा झालेली बेंबीतली सुतं काढीत
मी पूर्ण करतो माझ्या आयुष्यातला एक दिवस 

सकाळी बायको आजच्या पेपरावर बसलेला
कालच्या बनीयनचा बेंबीतला सुताचा बोळा उडवत
वाचून दाखवते मोठमोठ्याने
आजच्या पेपरातला ‘पॉझिटीव्ह थिंकिंग’चा लेख
आपलंच काहीतरी चुकतंय अशा रोखात 

रंग उडालेली ब्रँडेड पँट घरात वापरायला काढून
मी समारोप करतो या विषयाचा
आणि जुन्या पँटचे उसवलेले खिसे
टीप मारायला टाकतो

Friday, November 02, 2012

तेव्हा अख्खी वहीच असायची डोक्यात कवितांची


तेव्हा अख्खी वहीच असायची डोक्यात कवितांची

एका ओळीत गर्दी करून असायचे शब्द श्वासांसोबत 

उभा जन्म भरून पावायाचा
शब्दांतून रितं होत जाताना

नि वाटायचं सगळ्या जगाला आपण देत आहोत मंत्र
सुखी होण्याचा

तेव्हा रोज व्हायचीच
सकाळ दुपार संध्याकाळ रात्र

तेव्हा असायचे
उन वारा पाउस थंडी

तेव्हा दिसायचे रंग
काळे-पांढरे गडद-फिके

तेव्हा कळायचे नाहीत कशाचेच नेमके अर्थ

तेव्हा किती सहज व्हायचे अर्थाचे अनर्थ

पण तेव्हा वाटायचं नाही काहीच व्यर्थ
आत्तासारखं

Tuesday, July 10, 2012

ये ट्रेलर नही पुरी पिक्चर है मेरे दोस्त


आज हरायचंच म्हणून कुठलाच दिवस उजाडला नाही
तरी हरतच परतलो दर संध्याकाळी.

कित्ती धोरणं आखत राहिलो रात्र रात्र
अन् ऐन उन्हात वितळून गेलो स्वतःसकट.

बडबडलो वाट्टेल ते जगाविषयी उगाच
माझ्याविषयी बोलून बोलून बोलणार काय? मौन.

लग्नाच्या बोहोल्यावर, गणपतीच्या देवळात
डोंगराच्या टोकावर, समुद्राच्या काठावर,
हिरव्यागर्द जंगलात, घमघम वाऱ्यात, पुनवेच्या चांदण्यात,
–तंबाखू संपली वाट लागली.

मी आलो मी पाहिलं तरी ठेचकाळलो च्यामारी
ती आली ती जिंकली अन् इगो झाला मला.

ये ट्रेलर नही पुरी पिक्चर है मेरे दोस्त.
कहानी कबकी खतम हो चुकी है.

Monday, June 04, 2012

गर्दीत हरवलेला मी


गर्दीत हरवलेला मी शोधत राहतो
त्याच गर्दीत सापडशील का तू कुठे?

माझ्या तमाम रातआंधळ्या स्वप्नात
अजूनही वावरते आहेस तू बेधडक
कितीही गुंगीत ठेवलं स्वतःला तरी.

तुझा स्कार्फ, गॉगल, हँडग्लोव्हज
बंदोबस्तासाठी सज्ज असतीलच नखशिखांत.

आणि तरीही
तुझ्या केसांचा, काजळाचा नि तुझ्या आवडीच्या अत्तराचा
एकत्रित वास घेऊन येईल तुला माझ्यापर्यंत.

बस एवढीच एक शेवटची ओळख शिल्लक आहे माझ्याकडे
बाकी तुझाही चेहरा हरवत चाललाय स्मरणातून
माझ्यासारखाच गर्दीत. 

Saturday, June 02, 2012

आपण


एक बेरकी सल सलत राहतो जन्मभर
सेप्टिकही होत असेल कुणास ठाऊक.
चाहूल नसते जराही - वाऱ्याच्या इतिहासाची-भविष्याची
आपलंच नशीब फुटकं म्हणत हताश झालो तरी.
तिच्या डोळ्यांतल्या प्रवासात भटकताना हरवलो आरपार तरी
‘ध्यान लागल्या’चं म्हणत नाही कुणीच.
या अचाट ब्रम्हांडात अनंत सूर्यमालेत
रोज चड्डी घालावी लागतेय- लाजेपायी.
चिमण्या गेल्या उडून हाकेबाहेर
अँग्री बर्डचे नेक्स्ट व्हर्जन अपलोड करताना.
इकडचे रक्त तिकडे तिकडची किडनी इकडे कात्र्या सुरे सलाईन -
एक दिवस सुखाने मरण्यासाठी.
आपल्याच स्वप्नाला लावून ठेवावं गालबोट
इतके प्रामाणिक आपण.
तोडलेल्या फांदीला पुन्हा पालवी फुटणार या निकषाने
कलम झालेलो आपण.

Friday, May 25, 2012

चॉईस


ही केवढी मोठ्ठी चक्कर आलीये मेंदूला
किमान काही वर्षे नक्कीच लोटली असतील.

आणि तरीही अजून कोसळलोच नाहीये धाडकन
परिस्थितीच्या अंगावर.

बाकी सगळे लोक तर याच परिस्थितीच्या भोवती
फेर धरून हिंडताहेत

आणि उत्साहाने उडी घेताहेत परिस्थितीच्याच अंगावर.
गर्दी हटता हटत नाहीये.

मला ना चक्कर थांबवता येतेय ना उडी घेता येतेय.
कधी ना कधी मी फेकला जाणारेय
आत किंवा बाहेर.

मधोमध राहू अशी व्यवस्था उभारण्याचा दम
कधीच नव्हता अंगात.

आता फक्त चॉईस उरलाय
आत की बाहेर? बस्स.

कुठेही गेलो तरी फेकला जाणारच.

Monday, April 16, 2012

पावती


कित्ती पावत्या झाल्यात या डर्ॉवरमध्ये

ही ‘वैशाली’तल्या पार्टीची 
च्यायला किती लुटलं होतं ग्रुपनी एकदाचच मला.

हां ही ती हट्ट करून घेतलेल्या
दिवाली गिफ्टच्या मंगळसूत्राची.

हे बाबांच्या हॉस्पिटलचं बिल
मेडिक्लेम आहे म्हणून बरय.

अर्रे हे मोबाईलचं बिल इथे पडलाय होय?
तेव्हाच मिळालं असतं तर वॉरंटी पिरियडमध्येच दुरुस्त झाला असता ना.

ही एक पावती एकावर एक फ्रीवाल्या पुस्तकं प्रदर्शनाची
कुठे ठेवलीयेत हीनं पुस्तकं देव जाणे.

ही ‘स्वीकार’मधल्या कॉफीची
टाकून द्यावी. शंकेला कहार.

हे नवीन फ्रीज आणि वॉशिंग मशिनचं बिल
होऊन गेलं एकदाचं बरं झालं.

हा लकी ड्रॉ टूर्स आणि टर्ॅवल्सचा २५००० रुपयांचा
जाम गंडलो राव. तरी असू देत.

ही फ्रेम, ही चपला, ही पडदे , ही हॉटेल,
ही पण हॉटेल आणि ही पण हॉटेल.

छ्या वेळच्या वेळीच आवरायला हवं सगळं

ओह ही...
‘मला विसरून जा’ लिहिलेली
एकमेव प्रेमाची एकमेव पावती.

Tuesday, March 27, 2012

झाडांनो इथून पुढे


झाडांनो घ्या मजा करून
तुमची पिढी शेवटचीच कदाचित; स्वातंत्र्य उपभोगणारी.
इथून पुढे तुंम्हाला नाही मिळणार मुभा
बी पडेल तिथे उगवायला आणि
वेलींना म्हणू तसं अंगाखांद्यावर खेळवायला.

हळू हळू चढत जाईल तुमच्यावर कॉर्पोरेट लूक.
पक्षांना ठरवून दिली जातील
त्यांची स्थानं, त्यांची घरटी ‘चायना मेड’.

झाडांनो इथून पुढे नाही करावी लागणार तगमग
कातळ कापून ओलावा शोधायची. तो टिकवायची.
ठरल्यावेळी ठरला कोटा ठिपकत राहील तुमच्यापर्यंत.

दुबळे असाल तर मिळेल आधार
रोगी असाल तर औषधही
खंगलात तर वेळीच बंदोबस्त होईल तुमचा
स्वेच्छामरणाचा विचार मनात येण्यापूर्वीच.
माधामाशाही उडविल्या जातील हव्यातेव्हा-हव्यातशा.
परागकणांच्या उलाढालींचे डिजीटल मोजमाप होईल आपोआप.

इथून पुढे नाही रंगणार चर्चा एखाद्या अंगणात
तुम्ही कसे वागता याची.
आणि नाही चढणार एखादं मुजोर पोर शेंड्यापर्यंत सणासुदीला.
आमावस्या-पौर्णिमेला तुमच्या
सावल्यांची नि हालचालींची भीती नाही वाटणार दुबळ्या मनात.
की सवाष्णीही नाही धरायच्या फेर साताजन्मीचा.

पण आज जो घेतो मोफत श्वास आंम्ही आणि
होतो तरतरीत तुझ्या सावलीत कुठेही.
उद्या त्याच श्वासांसाठी आणि सावलीसाठी
काढून ठेवलेल्या कर्जांचे हप्ते चिकटून असतील आमच्या झोपेला.
झाडांनो आज घ्या मजा करून आणि
मलाही पडू द्या निपचित तुमच्या सावलीत.
उद्या मीही असू शकतो तुमच्या कार्पोरेट जगाचा यशस्वी उद्योजक.
  

Monday, March 19, 2012

किंवा


जातही असू आपण एकमेकांच्या 
जवळून भर रस्त्यातून नकळत
किंवा समोरा-समोर होताना ऐनवेळी वळत असू सावकाश
किंवा अगदी स मां त र असू रस्त्याच्या कडेने

किंवा
खुपच दूर असशील सातासमुद्रापलीकडे कम्फर्ट
किंवा  
 भलत्याच वेशीवर
किंवा
हयातही नसशील. ठाऊक नाही

किंवा 
 पुढे-मागे
अगदी भेटलोच आपण
योगायोगानं, प्रयोजनानं, ओझरते, कडकडून-घट्ट.
तरी काय? काहीच नाही

यां खोल आकाशाखालच्या छतावर
मी सोडतो आहे एक एक श्वास. बस.
आणि  पुन्हा घेतो आहे भरून.
कदाचित याच वाऱ्यात वाहून आला असेल तुझा निःश्वास माझ्यासाठीचा
किंवा माझाही एखादा निःश्वास बनत असेल तुझा श्वास. काहीही

किंवा
बघत असू या क्षणी एकच तारा आकाशातला
आणि अगदी याच क्षणी तूही करत असशील हाच विचार. हो ना?

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...