Monday, April 16, 2012

पावती


कित्ती पावत्या झाल्यात या डर्ॉवरमध्ये

ही ‘वैशाली’तल्या पार्टीची 
च्यायला किती लुटलं होतं ग्रुपनी एकदाचच मला.

हां ही ती हट्ट करून घेतलेल्या
दिवाली गिफ्टच्या मंगळसूत्राची.

हे बाबांच्या हॉस्पिटलचं बिल
मेडिक्लेम आहे म्हणून बरय.

अर्रे हे मोबाईलचं बिल इथे पडलाय होय?
तेव्हाच मिळालं असतं तर वॉरंटी पिरियडमध्येच दुरुस्त झाला असता ना.

ही एक पावती एकावर एक फ्रीवाल्या पुस्तकं प्रदर्शनाची
कुठे ठेवलीयेत हीनं पुस्तकं देव जाणे.

ही ‘स्वीकार’मधल्या कॉफीची
टाकून द्यावी. शंकेला कहार.

हे नवीन फ्रीज आणि वॉशिंग मशिनचं बिल
होऊन गेलं एकदाचं बरं झालं.

हा लकी ड्रॉ टूर्स आणि टर्ॅवल्सचा २५००० रुपयांचा
जाम गंडलो राव. तरी असू देत.

ही फ्रेम, ही चपला, ही पडदे , ही हॉटेल,
ही पण हॉटेल आणि ही पण हॉटेल.

छ्या वेळच्या वेळीच आवरायला हवं सगळं

ओह ही...
‘मला विसरून जा’ लिहिलेली
एकमेव प्रेमाची एकमेव पावती.

4 comments:

  1. ओह ही...
    ‘मला विसरून जा’ लिहिलेली
    एकमेव प्रेमाची एकमेव पावती.

    I was waiting for a twist like this

    ReplyDelete
  2. अति उत्तम! या कवितेला एक सुंदर design आहे़

    ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...