Monday, November 21, 2011

तुझ्यावरची कविता


ये तुला उलगडून दाखवीन
तुझी एक कविता.
तू करशील स्पर्श एकेक अक्षराला
जी तयार झालीयेत फक्त आपल्याच लीपीने.
तू फिरवशील बोट
भूतकाळातून ठिपकलेल्या नितळ दवावर.
तूच बोलून गेली होतीस ओघानं
"माझ्यावर लिही नं एकदा कविता"
तेव्हा पासुनचाच हा प्रवास आतल्या वळणाचा.

कविता सुचलीय खरी
पण शब्द नाहीसे झालेत समजून उमजून.
आपल्या दोघांत उगाच शब्दांची अडचण नको म्हणून.
अन् तसंही तूच लिहायाचीस काविता आपल्यांत शब्दांशिवाय.
मी नेणीव-जाणिवेच्या काठावर. तंद्रीत.

तू कोण? मी कोण?
कविता कोण?
हे प्रश्न मुळाचे. आदिम-अनादी.
भरात आलेला भुंगा आणि
कह्यात आलेलं फुल
कविते वाचून राहूच शकत नाही.
ते भविष्य घेऊन
भूतकाळ पेरीत जाणारच. संदर्भासहित.
अन् मुळाचं सांगायचं तर
ते प्रश्नांशिवाय जगूच शकत नाही.
अन् आपण प्रश्नांसहीत.
आठवतंय?
आपण आपले कितीतरी प्रश्न टाळून
बसून राहायचो मुळाशी निवांत.
म्हणूनच होत राहिल्या आपल्यांत कविता.

अन् आठवतंय?
तू दिली होतीस एक कोरी वही
’सप्रेम भेट’ न लिहिता .
मला हव्या त्या मजकुराची मुभा देऊन.
अन् तेव्हाही मी भरवून टाकली होती एकेक ओळ.
शब्दांशिवाय.
तर तीच तुझी आवडती कविता झाली होती.

आता त्याच वहीत तेच शब्द
गिरवून दृष्यं करायचे म्हंटले तरी
अर्थाचं काय?
पुन्हा लागेल तुला तोच अर्थ तंतोतंत ?
की तुला देऊ करायचेत नवे अर्थ?
पण पुन्हा तू बोलणार अशी काहीच नाहीस त्याही वेळी.
मी गिरवून मोकळा झालो तरी.
हे मलाही माहिती आहे
यापैकी आता काहीच होऊ शकत नाही.
पण एक जाणवतंय
आपण याही वेळी जन्म देतोय नव्या कवितेला. शब्दांपार.
तू आलीस की दाखवीन उलगडून
तुझी एक काविता.

3 comments:

 1. शब्दांपारची कविता ही कल्पनाच एकदम ग्रेट आहे!

  ReplyDelete
 2. "अन् आठवतंय?
  तू दिली होतीस एक कोरी वही
  ’सप्रेम भेट’ न लिहिता .
  मला हव्या त्या मजकुराची मुभा देऊन.
  अन् तेव्हाही मी भरवून टाकली होती एकेक ओळ.
  शब्दांशिवाय.
  तर तीच तुझी आवडती कविता झाली होती."

  दंडवत...

  "५
  आता त्याच वहीत तेच शब्द
  गिरवून दृष्यं करायचे म्हंटले तरी
  अर्थाचं काय?
  पुन्हा लागेल तुला तोच अर्थ तंतोतंत ?
  की तुला देऊ करायचेत नवे अर्थ?

  पण पुन्हा तू बोलणार अशी काहीच नाहीस त्याही वेळी.
  मी गिरवून मोकळा झालो तरी.

  हे मलाही माहिती आहे
  यापैकी आता काहीच होऊ शकत नाही.
  पण एक जाणवतंय
  आपण याही वेळी जन्म देतोय नव्या कवितेला. शब्दांपार.

  तू आलीस की दाखवीन उलगडून
  तुझी एक काविता."

  साष्टांग दंडवत...

  ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...