Friday, January 28, 2011

रस्ते


रस्ते बांधले
झाडं कापून
इवल्या पक्षांचं अंगण टाकून
अन् आकाशाला गवसणी घालायला निघालो आपण

किती लोक रस्ता धरतात
सकाळ होता होता
कितीही कोंडी झाली तरी
माणूस कोंडीत सापडत नाही रस्त्यावर
घरच्यासारखा
नि रस्ता मागे खेचत नाही
घरच्यासारखा
हा हा म्हणता
केवढी प्रगती झाली राव
तरी लोक रस्त्यावरच उतरू पाहताहेत
मैदानं सोडून

मिरवणूका वराती यात्रा अंतयात्रा
मोर्चा दंगली फटाके अश्रूधूर
शतपावली मॅरेथॉन धावपळ
खाणं पिणं थुंकणं
गप्पा टाळ्या कट्टा शिट्ट्या
पेपर बातम्या अफवा
शाळा दुकानं
सगळा संसार थाटला रस्त्यावर
काही संसार रस्त्यावर आले
ते निराळेच

तरी रस्तेच चुकत राहिले नेहमी
माणसांऐवजी
माणसं चुकलीच नाहीत राजे
वर चुकणा-याला रस्ताच दाखवला गेला शेवटी

इतक्या रस्त्यातही रस्तेच
सापडले नाहीत न काहींना
रस्त्यांने देऊ केलाच त्यांनाही एक कोपरा
आणि ज्यांना मिळाले रस्ते ते
रस्त्यावर येईनासे झाले

अजून कितीतरी नवे रस्ते
बांधायचे आहेत म्हणे यंदा

3 comments:

  1. माणस चुकत नाहीत .. रस्ते चुकतात .. हे एकदम आवडल! .. म्हणजे ते खर नाहीये तरी आवडल .. तुम्ही सर्वसामान्य मानसिकता अचूक पकडलीत शब्दांत!

    ReplyDelete
  2. निःशब्द केलंत नेहमीप्रमाणे!

    ReplyDelete
  3. it made me remind
    Billy Joel - We Didn't Start The Fire :)

    ReplyDelete

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...