Monday, May 24, 2010

मला जगायचय

सुरकुती देखिल हलणार नाही
किंवा माशी उठणंच काय पण
बसणही पसंत करणार नाही अशा
सुतकी चेह-यानं दाखल झालो
या शहरात...


कितीही असह्य असले तरीही
अपरीहार्य असणा-या इथल्या रस्त्यांवर
थोडंस दबकत थोडसं थबकत
काळजीपूर्वक सगळं न्याहाळून
निश्चित करून टाकलं एकदाचं
स्वत:च्याच राहत्या घराचं
या शहरातलं स्थान ।


पैसा , हिशेब , व्यवहार , स्वार्थ
या मूलभुत गरजांशी जुळवून घेताना
त्रास झाला खरा या शहरात.
प्रेम , माणूसकी , आपुलकी , त्याग , निष्ठा
इत्यांदिंची वळकटी करून काखेत कोंबताना
त्रास झाला खरा या शहरात।


पण आता?
आता अवघं आयुष्यं
सुरळीत चालू आहे.
पैशाने विकत मिळणा-या
त्या तमाम उपभोग्य वस्तूंचे आभार....
आता एकटं असूनही
एकटं असल्यासारखं वाटत नाही या शहरात...
अन वाटलच जरासं एकटेपण
तरी त्रास होत नाही.
कारण इथे सगळेच एकटे...


अन्याय, आत्याचार, जूलूम, पिळवणूक, फ़सवणूक
या सा-यांवर मी कधी कधी
चिडतो, संतापतो, तडफ़डतो, तळमळ्तो
पण सारंकाही हिशेबात सारंकाही हिशेबानच।


कधी कधी अभिमानानं उरही
भरून येतो माझा की
आपल्यासारख्याच निर्वासित बांधवांच्या तुलनेत
किती पुढे आलो आहोत आपण
आपण इथले की तिथले असा प्रश्नही
पडत नाही आता स्वत:ला.
पण कसं सांगू त्या
निरश्रीत अजाण बांधवांना की
या शहरात जगायच असेल तर
भिका-याच्या थाळीतून एखादा
भाकरीचा तुकडा किंवा
देवळाच्या दारातून नवी कोरी चप्पल
चोरून आणायची क्षुल्लक सवय देखिल
तुमचे आयुष्य रुळावर आणू शकते।


असो शेवटी ज्याचं नशिब आणि तो...

आता अभिनयाच्या अंगानं का असेना
पण माझा चेहरा हसरा असतो.
हेवा वाटावा असा आनंद ओसंडत असतो
माझ्या चेह-यावरून
अवघ्या विश्वाची कळकळ असावी
इतकी करूणाही भरून ठेवता येते
मला माझ्या डोळ्यांत सोईनुसार...


आणखी एक महत्वाचं
या माझ्या झालेल्या शहरीकरणाचा
मी जराही त्रास करून घेत नाही
कारण ...
असं का होईना तसं का होईना
मला जगायचय ... मला जगायचय ...

:कमलेश

No comments:

Post a Comment

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...