Friday, May 21, 2010

ठणक

दिवसभराचा थकलेपणा गोळा करत
एक ठणक जमा होतो
कुठेतरी शरीरात ...
निवांत रात्री पाठ टेकवताना
ठणक वेधून घेतो माझं लक्ष।


पूर्वीचे लोक किती कष्ट उपसायचे
तरी टवटवीत असायचे.
आपण उगाचच लाड पुरवतो शरीराचे
असा विचार करत
मी दुर्लक्ष करतो माझ्या ठणकेकडे .
किंवा उपाय म्हणून एखादी काँम्बीफ़्लेम घेतो।


कुशीवर वळताना जाणवत राहतं
पोट वाढल्याचं...
उद्यापासून नक्की व्यायाम करायचाय
असा दिलासा देत स्वत:ला
झोपी जातो आपोआप।


सकाळी उठल्यावर
पोट साफ़ होत नसतं हवतस...
काय खाऊ काय नकोच्या कन्फ़ूजनमधेच
मी पोटात ढकलतो
दोन प्लेट नाष्ता.
आणि पुन्हा सामिल होतो
दिवसभराच्या धामधूमीत।


मी जीवावर आल्यासारखी
करत राहतो कामे दिवसभर
दिवस जातो कसाबसा ...


पण पुन्हा नवा ठणक
जमा झालेला असतो
पोटाचा आकार अजून मोठा दिसतो
झोपी जाता जाता...


एखाद्या रात्री मधेच जाग येते
घामाघूम होऊन
जळजळत्या छातीवर हात ठेऊन मी
सुन्नपणे बसतो...
मला स्वप्नं पडालेलं असतं
मी मेल्याचं ....
मी थोडावेळ विचार करतो
माझ्या मरणाचा...
मग घड्याळ बघतो
रात्र खुप झालीय म्हणुन
पुन्हा झोपी जातो गाढ।


माझ्या मरणाकडे दुर्लक्ष करीत.....


: कमलेश

No comments:

Post a Comment

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...