Tuesday, May 18, 2010

प्रेम


किती वेळा किती जणींच्या
प्रेमात पडलो मी...
आणि तरीही
" प्रेम एकदाच होतं आयुष्यात "
हे वाक्यही वाटायचं खरं
त्या त्या प्रेमात ...

नववीच्या वर्गात असतना
झाला होता चुकून नकळत
एका मुलीच्या गार हातांचा स्पर्श
रोमांच उठले रानभर
त्या रात्री पडलं होतं
तिचच मोठ्ठ स्वप्नं
जाग आली झोपेतून-स्वप्नातून मध्यारात्री ...
पण तरी जागेपणी
करून टाकलं होतं ते स्वप्नं पूर्ण
पुढे काही दिवस रचत राहीलो
तिचीच स्पप्नं वाट्टेल तशी...

तेव्हा या प्रेमाला ’प्रेम’ हे नाव द्यायचं
ध्यानातच आलं नाही ...

पुढे कॉलेजात आल्यावर
कसं कुणास ठाऊक
एक मुलगी माझ्याकडं - मी तिच्याकडं
डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो
न ठरवूनही सगळं काही ठरल्याप्रमाणे...
कधी यायचं, कुठे बसायचं,
कुठला बेंच
ती जवळून गेली तरी
श्वास थांबायचा आपसूक
वाटायचं तिचे बोलके डोळे
सारं काही सांगताहेत मला
मग खूप विचार करायचो
ठरवायचो की ...
तिला जाऊन विचारावेत
तिच्या डोळ्यांचे अर्थ.
पण धाडस झालं नाही कधीच
ना तिच ना माझं
नंतर न ठरवूनही ठरल्यासारखं
’या जन्मात भेट होणे नाही’
हेही मान्य केलं आम्ही.
पण डोळे मिसळतच राहीले डोळ्यांत
एकमेकांना दिसेनासे होईस्तोवर।

वाटलं हेच प्रेम। शब्दातीत.

पुढचा मामला औरच
पोरगी दिसली , आवडली ,
डाव रचले , इंप्रेस केलं ,
प्रपोज केलं, पटवली ।

भरपूर भेटलो , प्रचंड बोललो ,
शेअरींग केलं , एक्सप्रेस झालो ,
ओकलो।

प्रायव्हसी मिळवली, हातात हात घेतले,
जवळ बसलो, स्पर्श केले
एकरूप झालो।

मग शपथा घेतल्या
कधी दूर न जाण्याच्या
एकमेकांसाठी जीव देण्याच्या।

नंतर लग्न झालं...
तिचं कुणाशी माझं कुणाशी
पण ना तिने जीव दिला
ना मी जीव दिला.
अन आता किती हूशारीनं चाललो आहोत
एकमेकांचे रस्ते टाळत...

आता बायकोशी मी किंवा
बायको माझ्याशी
नाही लावत बसत
प्रेमाचे अर्थ - तर्क किंवा काही
एकमेकांचे बंधन झाल्यासारखं
वाटतं दोघांनाही
पण जीव थंड झाल्यासारखंही वाटतय...

यापैकी कशालाच आता
प्रेम म्हणवत नाही.
पण जे झालं ते
अगदीच निरर्थक होतं
असही म्हणवत नाही।
: कमलेश

1 comment:

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...