Tuesday, May 25, 2010

कोंब

मी माझ्यापासून पळतो आहे लांब
अन म्हणतो आहे मलाच वेड्या थांब


ही पराभवाची गर्दी जमली भवती
अन अपमानांचे घाव उराशी सलती


आतून उधळती अहंकरी घोडे
पावलास एका एक नव्याने कोडे


ऎकीतो माझी मी कौतुके असेना खोटी
घोटतो गळा मी सत्य असे ज्या ओठी


त्या सत्य असत्या पासून आहे दूर
ही वणवण चालू उरातूनी काहूर


द्याविशी वाटते तनामनाला भूल
ती नको नकोशी जगताची चाहूल


मी मलाच हा सामोरा कैसा जाऊ
रूप विद्रूपाचे कसे कळेना साहू


मी चंचल, उदास, उजाड झालो आहे
मी असह्य होऊन मलाच भ्यालो आहे


चाललो दूर मी माझ्यापासून लांब
मी मला भेटता उगवेन फ़िरोनी कोंब


: कमलेश कुलकर्णी

No comments:

Post a Comment

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...