Tuesday, May 25, 2010

स्वगत


टाचा उंचाऊन कधी पाहीलच नाही
दिसू शकले असते असे
नजरेतील काही टप्पे...
की भरू दिल्या नाहीत जखमा
सहानुभूतीच्या दयावान नजरेसाठी...

कुणाच्याही ढुगणावर लाथ
मारली नाही बिष्यांत;
तसं कुणाला जवळही केलं नाही पार

आकाशाचं कौतुक ऎकणारं कुणीतरी होतं
तोवरच सुचत राहील्या आकाशावर कविता
उद्या वा-याचं कौतुक ऎकणारं भेटेलच की कुणीतरी
तेव्हा वा-यावरही होईलच लिहून ...

ते सगळे वाटत राहीले जवळचे
ज्यांना गरज होती माझी
कुणीतरी आपलसं म्हणतय या समाधानाखातर

उपक्रम सुरू केले दिमाखात
नंतर बंदही केले गुपचूप
करीत राहीलो स्वत:ची समर्थने
दुसरा अटळपणे
मान्या करीत नाही तोवर ...

कधीही केला नाही खुलासा
स्वत:जवळ;
स्वत:कसूनच झालेल्या चूकांचा.
तिरस्कारांचे जंतू फ़िरत राहीले रक्तात
अन प्रगल्भ होत गेली
एकलेपणाची जाणीव
दुस-याच्या तीळभर यशाने।

पोरीही आवडल्या
त्यांच्या सवडीनं;
फ़ुलांचे निर्माल्य होत राहीले नियमीत
दिवसेंदिवस दगडाचंच होत गेलं
मन, ह्र्दय ...
"पुन्हा प्रेम करणे नाही .
असचं वाटत राहीलं दरवेळी..."

हसलो नाही मनमुराद
की फ़सलो नाही
घुसलो नाही कुठे खोलवर की
बसलो नाही

उपकारांपासून दूर ठेवला माथा
वा-याशी फ़िरू दिले नाहीत श्वास
झोपेत चूकूनही पडलं नाही
एखाद्या बक्कळ श्रीमंताचं स्वप्नं
गर्भपात करून टाकले वेळीच अशा
भलत्या-सलत्या स्वाप्नांचे
की ज्यांना जन्मभर पोसणं
परवणारं नव्हतं कधीच

गर्दीत फ़िरत राहीलो बेवारस
एकांतात मालक झालो जगाचा
अंधारात चाचपडत राहीलो प्रकाश
उजेडात दिव्याकडं पाहयचं
विसरून गेलो

पण ओसंडून बोललो आजवर
फ़ुगीर आधिकारानं
केलं तसं काहीच नाही
लिहीलही बरच काही उत्साहात
शेवटी फ़िकीच पडली शाई

स्वत:च्या आत शिरलो नाही कधी
की बाहेरही पडलो नाही
मनाच्या खुंटीला जन्मभर टांगून ठेवलं
स्वत:चंच जिवंत प्रेत

आत्महत्या कराविशी वाटली खरी एकदा
नंतर वाटलं ...
"मरू देत; नाहीतरी मेल्यावर
दखल कोण घेणारेय आपली..."

: कमलेश कुलकर्णी

No comments:

Post a Comment

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...