Friday, May 21, 2010

आकाश


हे माझ्या प्रिय बांधवांनो ...

तशा आमच्या दारांना अद्याप
आतून ब-याच कड्या शिल्लक आहेत तुमच्यासाठी...

म्हणुनच मी नाकारतोय
माझ्याच घराच दार
आणि बसतो कडी तुटलेल्या खिडकीपाशी ।

मला सापडत जातात
तुमच्याच कुठल्याश्या पुस्तकातून
आमच्याच जात बांधवांनी केलेली
पाशवी क्रूत्ये
मंदिराला कुलूप ठोकून
गाभा-यापर्यंत पोहचायला
तुंम्हाला केलेला मज्जाव

तुमचा उद्वेग , तुमचा लढा ,
आणि तुमचे विद्रोही निशाण
आकाशाच्या रंगाचे...

मला अभिमान वाटतो तुमचा।

पण तरी मी झुगारतो
तुमच्याही निशाणीच अस्तित्व
माझ्या निशाणीसारखं...
आणि कड्या असलेल्या दारांसारखं...

तुंम्ही लढायचं थांबा आता.
आणि नाकारत - झुगारत चला
आमचं अस्तित्व.
(आंम्ही नाकारतो तसं)
स्वत:चा शक्तिपात रोखण्यासाठी।

जिथं तुमचा-आमचा हा भेदच गौण आहे
तिथं लढून काय मिळणारेय
आपल्याला?

उद्या पुन्हा होऊ शकतो
गाभार्यापर्यंतचा प्रवेश बंद तुंम्हाला
तेव्हा स्वत:चा गाभारा मांडा दाराशिवाय
पण जेव्हा आंम्ही करू तुमचे
पाणवठे बंद
तेव्हा पाणि निशिद्ध माना स्वत:हून
आणि फ़क्त रक्त प्या
आमचं-माझं
तेवढं धारीष्ट्यं दाखवा ऎनवेळी ... प्लिज...

खुप घूसमट होतेय या
जाड भिंती अन दारं , खिडक्याच्या घरात।

कुणी मांडून ठेवलाय
हा रंगाचा खेळ माहीत नाही
आणि आपण येवढे का
गुंतलो आहोत या खेळात
ठाऊक नाही

आपण फ़क्त आकाश
आपले मानुयात
ज्याचे तुकडे करणं
अजून तरी शक्य नाही.
:कमलेश

No comments:

Post a Comment

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...