Tuesday, May 18, 2010

जखमी


उमगत नाही इतका का मी मलाच जपतो
जपतो तरीही असा कसा मी जखमी होतो

पुसता माझ्या मी या जन्माचे कारण
आयुष्याला माझा तेव्हा विटाळ होतो

किती किती हे भाव पेरले चेह-यावरती
भावाहूनही भाव तरी चेह-याला मिळतो

रात्रीतूनही या धरतीवर प्रकाश आहे
अंधार आता बस फ़क्त आपल्या मनात होतो

तीळ कसा बघ अश्या नेमक्या गाली तुझिया
जीव बिचारा त्याच्यावरती तीळ तीळ तुटतो

वयात आलो आम्ही दोघे एकावेळी
बाकी आता एकावेळी काही ना करतो

नाळ मिळाली हातामध्ये या जन्माची
हवा तसा जन्माचा या मी जन्म घालतो

मस्त होऊनी प्रेमा मी शोधाया गेलो
लफ़द्यांमधूनी आता मी मग मला शोधतो

खरे सांग तू तेव्हा का तुज नव्हते ठाऊक ?
निराश होतो थोडासा मी हताश नव्हतो

शिव्या घालतो मनात मी कवितेला इतक्या
शिव्यातूनही पुन्हा नवा मी कविच होतो

शिळे खाण्यातच आईची या हयात गेली
बाप बिचारा केस पांढरे काळे करतो

अशी लागते मधेच या दुःखाला उचकी
शमण्यासाठी मी मग त्याला अश्रू देतो

लंगडत लंगडत आलो आहे आता इथवर
इथवर म्हंजे कोठे? हे ना कधी जाणतो

:कमलेश


No comments:

Post a Comment

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...